३२४
माझे आयुष्य तीन गुरू आणि
तीन उपास्य दैवतांनी घडले आहे
गुरूवार ता. २८ ऑक्टोबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हीरक महोत्सवानिमित्त पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे भरविण्यात आलेल्या अपूर्व सोहळ्यात १ लक्ष १८ हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. हा सर्व पैसा डॉ. साहेबांनी आपल्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी उपयोगात आणावा अशी विनंती हीरक महोत्सव समितीचे सेक्रेटरी श्री. शां. अ. उपशाम आणि श्री. आर. डी. भंडारे यांनी केली. त्यांच्या विनंतीचे सभेला जमलेल्या ३० हजार प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. परंतु ' माझ्यासारख्या बॅरिस्टरने आपल्या निढळाच्या घामाने जमविलेला गरीब जनतेचा पैसा स्वीकारणे बेशरमपणाचे आहे ' असे उद्गार काढून डॉ. बाबासाहेबांनी ती सर्व रक्कम मुंबईला बांधण्यात येणाऱ्या इमारत फंडाला दिल्याचे जाहीर केले.
अपूर्व स्वागत
एकशे पन्नासच्यावर संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हारतुरे अर्पण. करण्यात आले. त्यांच्या समवेत सौ. माईसाहेब आंबेडकर याही होत्या. अध्यक्षस्थानी श्री. आर. डी. भंडारे होते. सिद्धार्थ कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री. पाटणकर, प्रा. व्ही. जी. राव, रा. ब. बोले, श्री. दादासाहेब गायकवाड, श्री. आर. आर. भोळे, जनतेचे संपादक श्री. यशवंतराव आंबेडकर, प्रा. बोराळे, श्री. अनंत हरी गद्रे, श्री. ब. ह. वराळे, श्री. डी. जी. जाधव, शांताबाई दाणी वगैरे मंडळी हजर होती,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
मित्रहो,
आपण ही जी थैली, एक लाख अठरा हजार रुपयांची दिली आहे खरी, पण ती अगदीच हलकी आहे. (हंशा) मला थोडासा संशय आला. तरी हा जो मोठा आकडा मॅनेजिग ट्रस्टी यांनी जाहीर केला आहे त्याची सारी जबाबदारी मी त्यांच्याकडे सोपवीत आहे.
जनता : ६ नोव्हेंबर १९५४.