२८-१०-१९५४ माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे - Page 439

माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे ३९९

खरे म्हणजे माझा हीरक महोत्सव साजरा करून त्याप्रित्यर्थ ही थैली देण्यात आली, असे आताच सांगितले. हीरक महोत्सव हे माझं निमित्त झालं आहे. हे पैसे तुमचेच असून एक हॉल बांधण्यासाठी जमा केले आहेत. त्याला मूर्त स्वरूप यावं म्हणून मी ते माझ्या वयाच्या साठाव्या वर्षी द्यावे असे फक्त म्हटलेले आहे. हा फंड गोळा करायला सुरूवात बऱ्याच वर्षापूर्वी झाली. १९४२ साली माझी एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये नेमणूक झाल्यामुळे मला मुंबई सोडून जावं लागलं. तेव्हा पैसा गोळा करण्याचं काम जरा जास्त सुस्त झालं होतं म्हणून १९५२ साली परत आल्यावर पुन्हा ते काम हाती घेतलं. परंतु दुर्दैवाने इमारतीसाठी जी जागा घेतली होती तिथं भाडोत्री घातल्यामुळे इमारतीचे काम सुरू करता येईना. भाडोत्रीही काढून टाकणं अशक्य झालं आहे. आता सांगायला काहीच हरकत नाही. मी थोडसं वजन खर्च करून मुंबईचा कायदा बदलून घेतला आहे. त्या कायद्यामुळे ते भाडोत्री आता निघून जातील व इमारतीचे काम सुरू होईल. मी हे जे केले ते जनतेसाठी केले आणि ही जी रक्कम जमा झाली आहे ती तुमचीच आहे. आपल्या समाजातील या दारिद्वी बाया-पुरूषांच्या निढळाच्या घामातून गोळा केलेला हा पैसा आहे आणि मी बॅरिस्टर आहे. एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा मेंबर होतो. तेव्हा प्रकृतीच्या निमित्ताने या गरीब जनतेचा पैसा घेणे बेशरमेची गोष्ट आहे. तेव्हा हा सर्व पैसा, एकदा मी सांगून टाकल्याप्रमाणे इमारतीसाठी खर्च केला जाईल. मला त्यातली एक. छदामही नको, असे येथे मी जाहीर करतो. (टाळ्यांचा गजर).

मित्रहो! आज या ठिकाणी बसलो असताना माझ्या पूर्व आयुष्यात ज्या काही घडामोडी झाल्या त्या सर्व चित्रपटासारख्या उभ्या राहतात. मी जन्मलो कुठे, माझ्या वडिलांनी कुठं कुठं मला नेलं, माझं काय काय केलं हे सारं डोळ्यांपुढे उभं राहिलं आहे. परंतु मला इथं एक गोष्ट सांगावयाची आहे ती ही की, माझ्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाली याला पुरावा तरी काय आहे ? (हंशा) मी कोणत्या साली जन्मलो याचा रेकार्ड नाही. कारण माझे वडील सिक्स पायोनियर बटालियनमध्ये होते. नंतर ते सेवन पायोनियर बटालियनमध्ये गेले. तेव्हा त्यांना मी त्यांचा मुलगा म्हणून काहीच महत्त्व वाटलं नाही. जन्म तारीख लिहून ठेवली नाही. ही किती यःकश्चित गोष्ट आहे. पण तीही त्यांना जमली नाही. आज जी जन्मतारीख आहे ती खरीच आहे असं कोणी सांगू शकत नाही.