कर्तृत्ववान नसली तरी चालतील, पण निष्ठेची माणसे हवीत ७
आहे. आमच्या उमेदवारांविरुद्ध नाना कंड्या उठविल्या जातात, पण लक्षात
ठेवा, तावून सुलाखून पारख केलेल्या उमेदवारांची मी निवड केली आहे. तत्त्वाला जागणारी ती माणसे आहेत.
मुंबई असेंब्लीत काँग्रेस मंत्रिमंडळाचा कारभार २ वर्षे ७ महिने चालू असता स्वतंत्र मजूर पक्षाचे १५ निष्ठावंत सभासद कोणाला हार गेले नाहीत. त्यांना फोडण्याचे भगीरथ प्रयत्न झाले. परंतु आमची १५ माणसे वादविवादात, शिस्तीत, राजकारणात ध्येयनिष्ठेची होती.
विद्वान, कर्तृत्ववान माणसे नसली तरी मला चालतील पण निष्ठेची माणसे हवीत, विद्येचा तुटवडा भरून काढण्यास मी खंबीर आहे. जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही. आपल्यावर व भावी पिढीवर येणारे संकट नाहीसे करून पुढच्या पिढीचा मार्ग सुकर करणे आपले कर्तव्य आहे. २००० वर्षे आपले पूर्वज गुलामगिरी मुकाट्याने सहन करीत आले आहेत. ती गुलामगिरी आपण सहन करणार काय ? (नाही. जनतेचे उद्गार) दरेक पिढीचे पुढच्या पिढीवरचे संकट नाहीसे करण्याचा प्रयत्न करणे कर्तव्य आहे.
२० वर्ष खटपट करून मुसलमानांनी जे मिळविले ते अवघ्या २ वर्षात आम्ही मिळविले ही काय कमी महत्त्वाची गोष्ट आहे ?
मी सध्या दिल्लीला राहत आहे. माझ्या टेबलावर एक घंटी आहे. मी घंटी वाजविल्यावर जसा चटदिशी माझा जमादार माझ्यापुढे हजर होतो, त्याचप्रमाणे दिल्लीहून मी स्वीच दाबले की मुंबईला ताबडतोब प्रकाश मिळतो, माझा हा जो आत्मविश्वास आहे तो खोटा नाही, खरा आहे. वस्तुस्थितीच्या पायावर उभारलेला आहे. मुंबईचे कालचे इलेक्शन पाहा. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या भंडारे यांना १२,८९९ मते व देवरूखकर यांना ११,३३४ इतकी मते पडली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ खावी लागली. मुंबईचे इलेक्शन हिंदुस्थानच्या इतिहासात कायमचे राहील.
लोकांना असे वाटते की, मुस्लीम लीग संघटित आहे. मुस्लीम लीगचे जास्त उमेदवार निवडून आले. मला असे सांगावयाचे आहे की, फेडरेशनची शक्ती मुस्लीम लीगपेक्षाही अधिक संघटित आहे. त्याचे कारण आहे. मुस्लीम कोटाच्या आत राहतात. आम्ही कोटाच्या बाहेर राहतो. आम्ही बाहेर राहूनदेखील शत्रुला बेदम मार देऊ शकतो. अशा परिस्थितीत अस्पृश्यांना राजकारण समजत नाही म्हणणे मूर्खपणा आहे.