२८-१०-१९५४ माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे - Page 442

४०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे.

सर्व ग्रंथाची त्यांनी माझ्याकडून पारायणे करवून घेतली होती. रामायण, महाभारत वाचून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला. माझे वडील मला म्हणत, '' आपण गरीब असलो म्हणून भिण्याचं काही कारण नाही. तू विद्वान का होऊ शकणार नाहीस ? '' एकदा मी कोणती तरी परीक्षा पास झालो होतो. त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझ्या वडिलांची इच्छा नसताही दादा केळुस्करांच्या मदतीने माझा सत्कार करायचं ठरविलं. माझे वडील म्हणायचे, ' नको सत्कार, मुलांचा असा सत्कार केला म्हणजे त्यांना पुढारी झालो असे वाटते. ( हंशा आणि टाळ्या ) त्यावेळी शेवटी सत्कार झालाच आणि दादा केळुस्करांनी मला बुद्धाच्या चरित्राचं एक पुस्तक बक्षीस दिलं. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला. मारुती, सीता, राम वनवासाला गेले ; धोब्याच्या सांगण्यावरून सीतेचा त्याग, कृष्णाच्या सोळा सहस्त्र बायका ह्या गोष्टी काहीतरी भयंकरच वाटल्या. ह्या गोष्टी माझ्या मनाची पकडच घरेनात. परंतु बुद्ध धर्माच्या त्या अभ्यासाने मला जास्त अभ्यास करावासा दाटला. त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे व माझी अशी ठाम खात्री झाली आहे की जगाचं कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल. हिन्दू लोकांना आपलं राष्ट्र जगवायचं असेल तर बुद्ध धर्मच स्वीकारला पाहिजे असं माझं नेहमीच सांगणं आहे. ॒ |

माझे दुसरे गुरू कबीर होत. माझे वडील कबीर पंथी होते. त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्त्वाचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे खरे . रहस्य कळले. मी मोठा कोणालाच म्हटले नाही. गांधीला मी महात्मा म्हटले नाही. कारण कबीराने म्हटले आहे, माणूस होना कठीण हे! तो साधु क्या. बने ! जो माणूस झाला नाही तो महात्मा कसा होईल ?

- आणि माझे तिसरे गुरू म्हणजे जोतीबा फुले होत. ब्राह्मणेतरांचे खरे गुरू तेच होत. शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकविले. पूर्वीच्या राजकारणात आम्ही जोतीबांच्या मागनिच जात होतो. पुढे मराठे आमच्यातून फुटले. कोणी काँग्रेसमध्ये उष्टे खाण्यासाठी गेले व त्यांच्याचपैकी आमचे रा. ब. बोले हे हिन्दू महासभेत गेले. ते येथे हजर आहेतच. कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र जोतीबांच्याच मार्गानी जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ पण जोतीबांचा मार्ग सोडणार नाही. हे असे माझे तीन गुरू आहेत. यांच्या शिकवणीने माझे आयुष्य बनले आहे.