माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे ४०५
नानाप्रकारचे सत्याग्रह केलेत. परंतु कोणी सहानुभूती दाखविली नाही. वर्तमानपत्रातून आमची व्यंगचित्रे ये. बातमीदार येत नसत. मी बहिष्कृत भारताचा संपादक होतो. १९१९ पासून १९४२ पर्यंत मी संपादक होतो. एकदा केसरीला जाहिरात पाठविली. त्याबरोबर जाहिरातीचे बिल रु. ३ ची मनीऑर्डरही केली. पण परत आली. कारण जागा नाही म्हणून टाइम्स ऑफ इंडियाला टेलिफोन केला. त्यांना वाटले कुठली ही भिकारडी त्रास द्यायला लागली. त्याचेही उत्तर नाही आणि आता सारखे पाठीमागे लागतात रिपोर्ट द्या म्हणून. ही अशी परिस्थिती. इतक्या थराला आमची चळवळ गेली. मी खरोखरच महार लोकांचा अतिशय ऋणी आहे. महार लोकांच्या बळावरच मी हे करू शकलो. हा माझा तीस वर्षाचा अनुभव आहे. महार रणशूर आहेत, लढू शकतात, त्याग करू शकतात. इतर कोणतीही जात हे करू शकत नाही. तेव्हा माझ्यादृष्टीने त्यांचे माझ्यावर अनेक उपकार झाले आहेत. मी येथे जातीवाचक उच्चार करतो याबद्दल कोणी आरोप करील. पण मी या जातीत जन्मलो याबद्दल मला मोठा अभिमान आहे. या स्थितीला अस्पृश्य समाज आला त्याचे बरेचसे श्रेय तुम्हा पुरूषांना आहे. त्यात स्त्रियांचाही मोठा भाग आहे. ३० वर्षापूर्वीच्या स्त्रिया फार वेडगळ आणि गलिच्छ राहात. मला त्यावेळी स्त्रिया ' बामण ' आहे असं म्हणत ' आम्हाला नाही बामण व्हायचं '- असं त्या म्हणत. आजची तशी स्थिती नाही. परंतु अजून आपण शिखरावर पोहोचलो नाही. मध्यावर आलो आहोत. कठडा चढत आहोत. कधी पाय घसरेल सांगता येत नाही. अजूनही संकटस्थिती मानली पाहिजे. मी पुढारी का तो पुढारी हे भांडण आता मिटविले पाहिजे. सार्वजनिक कार्याला मदत करा. हजारो प्रकारच्या संस्था दानधर्म करून जातीचा उद्धार करतात. कोकणस्थ ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, प्रभू इ. ब्राह्मणांच्या संस्था आहेत. त्यांनी आपल्या जातीच्या विद्यार्थ्यांना विलायतेला पाठविले आहे. मोठ्या हुद्याच्या जागा मिळवून दिल्या आहेत. त्या गोष्टी
ध्यानात घेऊन महिन्याला एक रुपया द्यायचं ठरविलं तर वर्षाकाठी कितीतरी कार्य
होईल. माझी आता म्हटली तर आठ दहा वर्षच राहिली आहेत. बाबासाहेब
आहेत म्हणून आम्ही काहीच करायचं नाही असं म्हणून भागणार नाही. मी आता
राजकारणापासून अलिप्त होणार आहे. तुमचं जीवन तुम्हीच उज्ज्वल करायचं
आहे. त्याग, चिकाटी, निस्वार्थीपणा, बल एकवटून कार्य करा. मला माझ्या
हयातीत तुम्ही आपलं काय करता ते पाहू द्या. मेल्यावर तुम्ही भलं केलं की
वाईट केलं हे मला कळणार कसं ? हे माझं तुम्हाला निक्षून सांगण आहे.