८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आज मुख्य भांडण कशात आहे ? इंग्रज सरकार या देशातून निघून
गेल्यावर कोण राज्य करणार ? हिंदू ? मुसलमान ? का हिंदू आणि मुसलमान मिळून ? आपल्याला पुष्कळ आमिषे दाखविण्यात येतात पण तुम्ही सर्वानी मुख्य भांडण समजून घेतले पाहिजे. आमचे जे भांडण आहे ते सत्तेचे भांडण आहे. आम्हाला सत्ता पाहिजे. हिंदुंचे राज्य नको आहे, भीक नको आहे. खरेखुरे स्वराज्य पाहिजे आहे. आमचा खरा लढा कॉंग्रेसशी आहे. मुसलमान जे मागतात ते काँग्रेस त्यांना देते. मुसलमान शेकडा पंचवीस आहेत. त्यांना शेकडा तेहतीस पूर्णांक एकद्वितीयांश जागा कबूल आहेत. आता ते ५० टक्के मागणी करतात. तेही द्यावयास सिमला परिषदेचे वेळी काँग्रेसवाले सिद्ध झाले आणि आमचा वाजवी हक्क असताना आम्हाला काय उत्तर ? सुईच्या अग्रावर जेवढी माती राहील तेवढीही मिळणार नाही ! (शेम-शेम-शेम) पुनरूपी पेशवाई कधीही न येऊ द्यायची असेल तर तुम्ही जागरूक राहिले पाहिजे. मी मुंबई असेंब्लीकरिता तुमच्या जिल्ह्यात जिवाप्पा ऐदाळेला उभे केले आहे. जिवाप्पा केवळ निमित्तमात्र आहे. सर्वकाही मी आहे, मला मते द्या. (प्रचंड टाळ्या).
मी जातिभेदाच्या अगदी विरुद्ध आहे. मी मांगांबरोबर-भंग्यांबरोबर जेवतो. जातिभेदाचा मी कट्टर शत्रू आहे. आपापसातील जातिभेद लवकर नाहीसे व्हावेत या मताचा मी आहे. हे जातिभेद ब्राह्मणांनी उत्पन्न केले आहेत. माझ्या फेडरेशनमध्ये जातिभेदाला कायमचीच माती दिलेली आहे. मांग, भंगी, चांभार इत्यादी सर्वाना मी समानतेने वागवतो. मी महार जातीत जन्मलो हा काही माझा दोष नाही. मुंबईत शेकडा ९० टक्के महार होते. पण मुंबईत चांभार समाजाचे देवरूखकर यांना उभे केलेले आहे. सुतार-सुताराला मत देणार, कासार-कासाराला मत देणार, असे मुळीच चालावयाचे नाही. सर्वानी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या उमेदवारालाच मत दिले पाहिजे. दुसरे उदाहरण, नाशिक म्युनिसिपालिटीमध्ये भंगी उभा केला. शेकडा ९० टक्के महार मतदार होते. महारांनी निवडून आणला.
खान्देशामध्ये एका मांग उमेदवारास तिकीट दिले होते. दुर्दैव बिचाऱ्याचे वाटेत त्याची मोटार बिघडली. नॉमिनेशन पेपरच्या वेळेत तो स्वत: हजर राहू शकला नाही. गेल्या दोन महिन्यांपूर्वी विलायतेस उच्च शिक्षणासाठी ३० विद्यार्थी आपले पाठविले. त्यात मांग आहेत, चांभार आहेत, ढोर आहेत व भंगीही पण आहेत. माझ्याजवळ जातिविषमतेला थारा नाही.