१४-११-१९५४ अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही - Page 450

३२६
अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही

हैद्राबादच्या मुक्कामात दिनांक १४ नोव्हेंबर १९५४ रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट ट्रस्ट्‌ फंड तफे संचालित होस्टेलला भेट दिली. या प्रसंगी होस्टेल लतापल्लवांनी सुशोभित करण्यात आले होते. होस्टेलचे चालक श्री. शेरसिंग यांनी थोडक्यात होस्टेलचा अहवाल सादर केला.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्याच्या प्रचंड मेळाव्यापुढे भाषण केले. ते म्हणाले,

ज्या लोकांनी ही बोर्डीग काढली आहेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर हैद्राबाद सरकारचेही आभार मानणे जरूर आहे. लोक आपणास नावे ठेवतील अशाप्रकारचे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवू नये. त्यांना मिळालेल्या या संधीचा वेळीच योग्य फायदा करून घेतला पाहिजे. माझ्यावेळची परिस्थिती फारच कठीण होती. आमची दहा बाय दहाची एक खोली होती. तीत सामान, कुटुंबातील दहा माणसे, एक बकरी व दोन पैशाच्या तेलाची एक चिमणी इतका परिवार होता. अशा परिस्थितीत मला अभ्यास करावा लागला आहे. मी फार अभ्यास केला असल्यामुळे लोक मला भितात. दुसऱ्यांनी वर्षभर प्रयत्न करूनही जे काम होत नाही ते मी दोन मिनिटात करतो (टाळ्या). याचे कारण मी फारच शिकलो आहे. तसेच तुम्हीही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपुरे विद्यार्जन करून काही उपयोगाचे नाही. परीक्षा कोणीही पास होतो. नुसत्या परीक्षा पास होऊन पदव्या मिळविण्यात काही अर्थ नाही. विद्यार्थ्यानी रचनात्मक कार्य करून दाखविले पाहिजे. दगड फोडीचे काम करण्यात व कारकून बनण्यात काहीच फरक नाही. |

या देशात ब्राह्मण समाजाची अशी समजूत होती की, विद्या फक्त आम्हीच प्राप्त करू शकतो. परंतु हे साफ खोटे आहे. कोणाएका युरोपियनाने म्हटले आहे की जगात सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक होत (टाळ्या). विद्या ही एक तरवार आहे. या तलवारीने कोणी कोणाची मान

जनता : २० नोव्हेंबर १९५४.