३२८
ब्रह्मदेशात अस्पृश्यता नाही म्हणूनच | तुम्हाला व्यापार व उद्योगधंद्यात प्रगती करता आली
रंगून येथे वास्तव्य करीत असलेल्या आंध्र प्रदेशातील शेड्यूल्ड कास्ट्स्
फेडरेशनच्या मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्काराची जंगी जाहीर सभा दिनांक ४ डिसेंबर १९५४ रोजी घेतली होती. यापूर्वीच सदर मंडळींनी बाबासाहेबांच्या दर्शनाचा लाभ तेथील जनतेला व्हावा म्हणून प्रयत्न केला होता. परंतु बाबासाहेबांच्या आजारपणामुळे त्यांच्या प्रयत्नास यश आले नाही. परंतु दी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धीस्ट कॉन्फरन्सच्या वेळी येथील जनतेची विनंती मान्य करून जाहीर सभेच्या कार्यक्रमास हजर राहाण्याची डॉ. बाबासाहेबांनी संमती दिली. सदर दिवशी येथील प्रशस्त अशा भव्य हॉटेलात तेथील मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना टी पार्टी (चहापान) दिली. तत्प्रसंगी रंगून येथे व्यापारानिमित्त अगर इतर उद्योगधंद्यानिमित्त कायमचेच राहिलेले पाचशे प्रतिष्ठित हिंदी नागरिकही उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या हॉटेलात प्रवेश होताच या सर्व नागरिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
चहापानानंतर सर्वांना उद्देशून डॉ. बाबासाहेबांनी फक्त १५ मिनिटेच भाषण केले. ते म्हणाले,
या ठिकाणी तुम्ही सर्व हिंदी लोक एकमेकांशी प्रेमाने व संघटनेने वागता हे पाहून मला समाधान वाटते. आपल्या देशात हे दृश्य पाहावयास मिळत नाही. ब्रह्मदेशाचे उदाहरण आपल्यापुढे ठेवून तुम्ही वागलात तर तुमचा अभ्युदय झाल्याशिवाय राहाणार नाही. मला येथील शेड्यूल्ड कास्ट्सूच्या लोकांनी या प्रशस्त हॉटेलात चहापान देऊन माझ्या विषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. ही गोष्ट घडण्यास त्यांची सांपत्तिक परिस्थिती समाधानकारक असली पाहिजे. त्याशिवाय ही महान खर्चाची बाब घडून येणे शक्य नाही. तुम्ही सर्वांनी असेच बंधुभावाने वागावे एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. hE FERN NE ASR Lh SWAP आक
जनता : २९ जानेवारी १९५५.