४-१२-१९५४ ब्रह्मदेशात अस्पृश्यता नाही म्हणूनच तुम्हाला व्यापार व उद्योगधंद्यात प्रगती करता आली - Page 458

४१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

चालू ठेवणे मुर्खपणाचे आहे. ब्रह्मी सरकारचे तुम्ही लोकांनी आभार मानावयास पाहिजे की, त्यांनी आपल्या घटनेत या देशात (ब्रह्मदेशात) आठ वर्षे राहात असलेल्या प्रत्येक इसमास या देशाचे कायद्याने नागरिकत्व पत्करता येईल, ही तरतूद करून ठेवली आहे. ती अभिनंदनीय आहे.

आमचे हिंदी सरकार व सिलोनी सरकार यांचा या नागरिकत्वाच्या बाबतीत केवढा मोठा झगडा चालू आहे. सिलोनी सरकार हिंदी लोकांचे नागरिकत्व मान्य करण्यास बिलकूल तयार नाही. या मानाने पाहाता ब्रह्मी सरकार किती तरी चांगले म्हणायचे. याकरिता तुम्ही लोकांनी विलंब न लावता या देशाचे नागरिकत्व अगोदर मान्य करा. या देशात अस्पृश्यता नाही म्हणूनच तुम्हाला व्यापारात व इतर उद्योगधंद्यात स्वतःची प्रगती करता आली. तुम्ही आपला नैतिक दर्जा वाढविला पाहिजे.

नंतर श्री राव, शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन प्रमुख यांनी तेथील जनतेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चांदीच्या करंडीतून मानपत्र अर्पण करून त्यांचा गौरव केला.