कर्तृत्ववान नसली तरी चालतील, पण निष्ठेची माणसे हवीत ९
विजापूर-अहमदनगर-बेळगाव तीन ठिकाणी मला येणे अशक्य आहे. हिदुस्थानातील सर्व प्रांत ओरडतात की, तुम्ही आमच्या प्रांतात अद्याप का आला नाही ? मला सांगायला अभिमान वाटतो मुंबई इलाख्यात राजकीय प्रगती अनुपम झाली आहे. विजापूर जिल्ह्यातील काही लोक येथे आल्यासारखे दिसतात. त्यांनी काळे यांना मते द्यावी व अहमदनगरच्या मतदारांनी रोहमला मते द्यावीत.
मरणाचे भय कोणाला ? एक गांगुर्डे मेला तर काय झाले ? बाकीची ३०० माणसे जखमी आहेत ती जरी मेली तरी त्यांचे काय ? माझे असे एक सहा महिने जात नाहीत की, मला "तुला गोळीने ठार मारू, खून करू" अशा प्रकारची निनावी पत्रे येत नाहीत. सगळ्यांनी निडर राहून या इलेक्शनमध्ये गुलामगिरीची बेडी तोडण्यासाठी फेडरेशनचा उमेदवार निवडला पाहिजे, हा अखिल अस्पृश्यांचा संग्राम आहे हे लक्षात ठेवा. सैन्यात जशा तर्हेने रणशिंग फुंकल्याबरोबर सर्व शिपाई एकदम गोळा होतात तसेच प्रत्येक स्त्री-पुरुषाने पोलिंग स्टेशनवर स्वत: जाऊन आपल्या उमेदवाराला मत दिले पाहिजे.