२५-१२-१९५४ पंढरपूर येथे बौद्ध धमाचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन - Page 464

४२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कोण होता यावर हुज्जत चालू आहे. पण माझा त्यांना खडा सवाल आहे की, विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पांडूरंग कोण ? याचे पहिल्यांदा उत्तर द्या. तो होता कुठे ? त्याला पळविलं कोणी ? कोणी डुबविलं ? पांडूरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करून देईन. (प्रचंड टाळ्या) पुंडलीक या शब्दापासून पांडूरंग हा शब्द झाला. पुंडलीक याचा अर्थ कमळ. बौद्ध धर्मात मूर्तीपूजा नव्हती. अज्ञानी लोकांना तत्त्वज्ञान काय कळे! कमळाला पाली भाषेत पांडूरंग असे म्हणतात. तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात. इकडे ' पांडव ' कशाला आले होते ? पांडव दिल्लीच्या बाहेर _ ८० मैलाच्या पलिकडे गेले नाहीत. त्यांनी अलवार स्टेटमध्ये पंधराशे लेणी खोदली कशी ? त्यांच्याजवळ टिकास नव्हती की पावडं नव्हतं. भगवान बुद्धाने सांगितले की ' ये आणि पाहा ' ! मी सांगतो म्हणून तुम्ही हा धर्म घ्यावा असे नाही. तुझी अविद्या नाहिशी झाली तरच तू या धर्माचा स्वीकार कर. आपणाला एक गोष्ट सांगायची बाकी राहिली आहे. हे जे देऊळ बांधण्यात आले आहे हे अत्यंत लहान आहे. ते जर आपण आहे हयाच स्थितीत ठेवाल तर आपल्याला काळिमा लागेल. या देवळाला एक हॉल पाहिजे. प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी आहे. तुम्ही सर्वानी वर्गणी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा. मात्र भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका.

आजच्या प्रसंगाला अनुसरून जे काही सांगावयाचे होते ते मी सांगून

टाकले. आजचा हा प्रसंग इतिहासामध्ये नोंदला जाईल. बाराशे वर्षानंतर

भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला

आहे. याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे. म्हणून आपण धन्यता मानली

पाहिजे.