१४-१-१९५५ हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? - Page 465

३३०
हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे
पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ?

मुंबई येथील बौद्धधर्म सल्लागार समितीतर्फे दिनांक १४ जानेवारी १९५५ रोजी वरळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. सभेला ५० हजारापेक्षा जास्त समुदाय हजर होता.

या सभेला संत गाडगे महाराज, श्री. अनंत हरी गद्रे, श्री. संत मोडके महाराज, कांबळे, करमाळेकर तसेच दलित फेडरेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

बऱयाच दिवसापासून मी असा एक निर्णय घेतला होता की, कोणत्याही सार्वजनिक कार्यात नुसत्या व्याख्यानासाठी कधीच हजर राहावयाचे नाही. कारण नुसत्या व्याख्यानबाजीचा मला कंटाळा आला आहे. व्याख्यानात माझा सारा जन्म गेला आहे, उभी हयात गेली आहे. तथापि माझ्या व्याख्यानांचा समाजावर काहीच परिणाम झाला नाही, असे नाही. आज माझ्यापुढे अस्पृश्य समाजात जी जागृती झालेली दिसून येत आहे, ती माझ्या व्याख्यानांचेच फळ आहे, असे मी अभिमानाने सांगू शकतो. |

जागृती हे जरी समाजाच्या उन्नतीचे मुख्य अंग असले तरी नुसत्या जागृतीचा उपयोग नाही. समाजाच्या उन्नतीकरिता काही विधायक कार्यक्रमाची आवश्यकता आहे. समाजात एखाद्या माणसाने जागृती केली व त्याच्या मरणानंतर समाजाला दिशा दाखविणारा दुसरा एखादा कर्तबगार पुरूष निर्माण झाला नाही तर एकखांबी तंबूप्रमाणे समाज मोडकळीस येतो.

मला आता काही तरी विधायक कार्यक्रम करायला पाहिजे परंतु त्याकरिता पैशाची अत्यंत जरूर आहे. त्यासाठी पैसा हवा आहे. मी एक मोठा याचक आहे. समाजातील इतर लोकांचे अंतरंग जर निर्मळ असेल व त्या निर्मळ अंतःकरणाच्या लोकांना आपले कार्य मंगल आहे असे वाटले व त्यांनी जर द्रव्याची मदत केली तर आम्हाला ती हवीच आहे ; परंतु त्यांच्या मदतीवर आपण विसंबून राहून चालणार नाही. आपण आपल्या बळावर उभे राहिले पाहिजे.

जनता : २२ जानेवारी १९५५.