१४-१-१९५५ हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? - Page 466

४२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

' ज्याचे मढे तोच खांद्यावर उचलतो ' तद्वतच आपल्या कार्याचा भार आपणच उचलला पाहिजे. आपल्या कार्याला आपणच मुक्त हस्ताने दान दिले

पाहिजे.

आज माझा धर्मोपदेशाचा उपोद्घात आहे. बौद्ध धर्मासंबंधी मला सांगावयाचे

आहे. बौद्ध धर्माची माझी घोषणा आजकालची नसून मी चौदा वर्षाचा विद्यार्थी होतो तेव्हापासूनची आहे. चौदा वर्षाचा असताना बौद्ध धर्माशी माझा परिचय झाला. चौदा वर्षाचा असतानाच रामायण, महाभारत, कृष्णलीलामृत, शिवलीलामृत, श्रीधराख्यान वगैरे सर्व मराठी ग्रंथ माझ्या वडिलांनी मजजवळून दहा दहा वेळा वाचून घेतले होते. वडिलांच्या अशा वागण्याचा निदान त्यावेळी तरी मला कंटाळा आला होता.

एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये असताना मी कुठली तरी एक परीक्षा पास झालो होतो. ज्या ' बटाट्याच्या चाळीत ' मी राहात होतो तेथील लोकांनी मी पास झाल्याबद्दल अभिनंदनपर सभा घ्यावयाचे ठरविले. दादा केळूस्करांना मध्यस्थी घालून मोठ्या प्रयासाने तेथील लोकांनी माझ्या वडिलांची परवानगी घेतली, एक टेबल खुर्ची मांडून सभेस सुरुवात झाली. पण काय, सभेला काही निवडक लोक सोडून कोणीच हजर नाही. जो तो लंगोटी लावून आपापल्या उंबरठ्यावर व ओट्यावर पान, तंबाखू चघळीत बसलेला होता. सभेचे महत्त्व कोणालाच समजलेले नव्हते.

पण आज परिस्थिती निराळी आहे. आज अस्पृश्य समाज जागृतीने बराच पुढे आहे. लहानपणी माझ्या अभिनंदनाप्रित्यर्थ जी पहिली सभा घेण्यात आली तिचे अध्यक्ष श्री. दादा केळूस्कर होते. त्यावेळेला मी सभेत काय वेडेवाकडे बोल बोललो असेन ते मला आता आठवतही नाही. भाषण संपल्यानंतर केळूस्करांनी गौतम बुद्धाचे छोटेसे चरित्र मला बक्षीस म्हणून दिले. रामायण-महाभारतासारखे बरेच ग्रंथ मी वाचून काढले होते. तसेच हेही पुस्तक मी वाचले. परंतु बुद्धाची शिकवण व इतर ग्रंथांची शिकवण यात बरीच तफावत आहे, असे मला आढळून आले. पुढे या पुस्तकासारखी नवीन नवीन पुस्तके जसजसी मी वाचू लागलो तसतसा माझ्या डोक्यात नवा प्रकाश पडू लागला. बुद्ध धर्म कसा व हिंदू धर्म कसा, दोहोत किती भेद आहे, किती निराळी दृष्टी आहे हे मला कळू लागले.