४२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पाठवावे. त्यावेळी बुद्ध धर्माची व्याख्या गौतम बुद्धाने शिष्यात सांगितली ती अशी ; ' बहुजनहिताय, बहुजनसुखाय, लोकनुकंपाय, हिताय, सुखाय, देव मनुस्सानं, धम्म आदी कल्याणं, मध्य कल्याणं, अंति कल्याणं '.
बुद्ध धर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरिता, सुखाकरिता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरता आहे. हा धर्म नुसत्या माणसांनीच स्वीकारून चालणार नाही, तर देवांनीसुद्धा त्याचा स्वीकार करावयास पाहिजे. ( टाळ्या ) ज्याप्रमाणे ऊस हा मुळातही गोड असतो, मध्येही गोड असतो व शेंड्यासही गोड असतो, त्याचप्रमाणे बुद्ध धर्म सुरवातीलाही कल्याणकारक आहे, मध्येही कल्याणकारक आहे व शेवटीही कल्याणकारक आहे. या धर्माचा आदि, मध्य, अंत सर्व गोड, हितकारक व कल्याणकारी असे आहेत.
पण कोणीही मला सांगावे की, आमचा हिंदू धर्म-ज्याला मी ब्राह्मणी धर्म समजतो-हा ' बहुजन हिताय, बहुजन सुखाय ' आहे काय? ब्राह्मण व इतर विद्वान लोक सांगतात की, ब्राह्मणी धर्माची संस्कृती १० हजार वर्षापूर्वीची आहे. जुनी संस्कृती आहे, पण आजही हिंदू धर्मात ७ कोटींच्यावर अस्पृश्य आहेतच. समाजातून बहिष्कृत केल्यामुळे जंगलात राहाणारे वन्य व चोऱ्या करून उपजिविका करणारे असंख्य गुन्हेगार लोकही या धर्मात आहेत. सांगा, अशा हिंदू धर्माला ' बहुजन हिताय, बहुजन सुखाय ' धर्म म्हणता येईल काय ?
जगातील काही कम्युनिस्ट वगळले तर असा एकही मनुष्य आढळणार नाही, ज्याला धर्म नको आहे. त्याचप्रमाणे धर्म आम्हालाही पाहिजे. पण तो सत्धर्म हवा, असा सत्धर्म म्हणजे जेथे सर्व लोक समसमान राहातील, सर्वांना सारखीच संधी मिळेल, तोच खरा धर्म. बाकीचे सारे अधर्मच होत.
हिंदू धर्माच्या शिकवणीप्रमाणे जर सर्वत्र ब्रह्मच आहे तर मग महारात, मांगात, चांभारातही ते असले पाहिजे. मग हिंदू धर्मात अशी असमानता का ?
इ.स. १९१० साली जेव्हा हिंदू-मुसलमानात जातीयवादावर बखेडा सुरू झाला तेव्हा हिंदू कोणास म्हणावे, हिंदूची व्याख्या काय, असा कठीण प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा भारतातील अकरा विद्वानांनी अकरा निरनिराळया व्याख्या केल्या.