२३५
माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही
पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे
[ दहिवडी (सातारा) ता, १५ फेब्रुवारी १९४६]
अध्यक्ष महाराज व बंधुभगिनींनो,
आज मी या ठिकाणी दिल्लीहून जवळजवळ १००० मैलांचा प्रवास करून
आलो आहे. याचे कारण म्हणजे हल्लीचा प्रसंगही तितकाच महत्त्वाचा आहे. जिकडे तिकडे पक्षोपक्षांची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पण अलीकडे हिंदुस्थानमधील वर्तमानपत्रांमध्ये एका गोष्टीला अगदी ऊत आलेला आहे व ती गोष्ट म्हणजे गांधी व माझ्यामधील झगडा. हा झगडा २५ वर्ष म्हणजे जवळ जवळ १९२० सालापासून चालू आहे. पण हा झगडा का व कशाकरता चालला आहे याचा तुम्ही सर्वजण विचार करा. गांधींचा टिळकांशी झगडा होता, गांधींचा गोखलेंच्या बरोबरही झगडा होता. गांधींचा सर चिमणलाल सेटलवाड बरोबरसुद्धा झगडा होता पण हे झगडेमात्र आता नामशेष झालेले आहेत. पण माझा गांधींशी चाललेला झगडा मात्र अजून चालूच आहे.
मी एका दरिद्री कुटुंबात जन्मलो आहे. कष्टाने व चिकाटीने मी शिकलो, पुढे बडोदा सरकारच्या मदतीने विलायतेस जाऊन पदव्या संपादन केल्या, नंतर नोकरी धरली. दोन वर्षांनी नोकरी सोडून परत विलायतेस जाऊन बॅरिस्टर व डी. अससी. झालो व तेव्हापासून समाजकार्य व धंदा प्रामाणिकपणे करीत आलो आहे. मी बंरिस्टरीस सुरुवात केली त्यावेळी हायकोर्टातील सर्व वकील ब्राह्मण व सर्व सोंलिसिटर्स गुजराती, त्यावेळीच गांधींकडे जाऊन काहीतरी माझ्याकरिता मला मागता आले असते व मानमरातब, केसेस व पैसाही मिळविता आला असता व गांधींना शरण जाऊन इतरांप्रमाणे माझा खाजगी वैयक्तिकवाद असता तर तोसुद्धा मी मिटविला असता. पण माझा व गांधींचा वाद न मिटता राहिलेला आहे. याचे कारण मला गांधींजवळ व्यक्तिश: काहीही मागावयाचे नाही. बुद्धीने, कर्तबगारीने व पुरुषार्थाने मी जीवन आक्रमित आहे. मी जे गांधींकडे मागत आहे ते तुमच्या वतीने जे न्याय तेच मागत आहे. माझा गांधींशी चाललेला हा झगडा आपल्या सर्व समाजाच्या वतीने असून तो सर्व समाजाच्या भवितव्यतेचा आहे.
गरुड : १० मार्च १९४६.