१४-१-१९५५ हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? - Page 470

४३० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच धर्म, बुद्ध धर्माचे अधिष्ठान हे जीवनात कल्याण साधायला अत्यंत आवश्यक आहे, म्हणून या धर्माची महती आहे.

अमेरिकेत खिस्ती धर्माचा प्रादुर्भाव फार पुरातन कालापासून होता व आहे; परंतु अमेरिकेसारख्या प्रभावी राष्ट्रात दोन हजारावर बौद्ध भिक्षु आहेत. पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेला खिस्ती धर्म लोकांनी सोडला व बौद्ध धर्म घेतला आहे.

अमेरिकेमध्ये फौजेतील शिपाईंसुद्धा बुद्ध धर्म अनुयायी आहेत. एवढेच नव्हे तर बुद्ध धर्माबद्दल आस्था म्हणून शिपाई लोक आपल्या ड्रेसवर (गणवेश) बुद्ध धर्माचे चिन्ह लावतात. अमेरिकन सरकारला बौद्ध चिन्ह वापरण्याबद्दल कायदे करण्यास त्यांनी भाग पाडले आहे. अमेरिकेत एक नुकताच अवाढव्य विहार बांधण्यात आला. त्याला साऱ्या जगातील देशांमधून जवळ जवळ २० लाख रुपये देणगी मिळाली.

जर्मनीत तर विचारायलाच नको. बुद्ध धर्म प्रचारसंस्था हजारोंनी गणल्या जातात. युरोपात असा एकही देश नाही की, जेथे बुद्ध धर्माचा प्रचार होत नाही. भगवान गौतम बुद्ध हा जगप्रसिद्ध युगपुरुष आहे. तेथील लोकांना रामाची, कृष्णाची, विष्णुची ओळख नाही.

जगाला हिंदुस्थानची आठवण म्हणजे गौतम बुद्धाची आठवण होय. हिंदुस्थान देश हा याच जगप्रसिद्ध पुरुषाची जन्मभू म्हणून ओळखला जातो. अजाणपणे खिश्चन धर्माचा स्वीकार केलेले हिंदी विद्वान लोक आज पश्चातापाने विव्हळ होऊन असे कबूल करीत आहेत की, तुलनात्मक दृष्टीने बौद्ध धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे.

आपणाला कल्याणकारक बुद्ध धर्म पाहिजे. आपले पूर्वज अज्ञानी होते. महारकी, भीक मागणे हीच यांची वर्तने. त्यांना धर्माची काय आवड ? पण आपण स्वावलंबी बनलो आहोत. इतर वर्गाच्या जोडीला. जाऊन आपल्याला उभे राहायचे आहे. धर्मामध्ये उन्नतीचा मार्ग मोकळा

हवा.

माझ्या इतर मित्रांचा असा समज आहे की, धार्मिक बाबींमुळे आर्थिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होईल. मी काही आर्थिक प्रश्‍न हाती घेणार आहे. . धार्मिक बाबींमुळे आर्थिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होईल, असे एखाद्या ' गड्याचे अथवा भाऊचे ' म्हणणे असेल तर त्याने मला आपली आर्थिक योजना दाखवावी. मला जर त्या योजनेची कल्पना पटली तर मी माझी सर्व शक्ती त्या कार्याला वेचीन. ”