१४-१-१९५५ हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? - Page 472

४३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जगाचा व्यवहार धर्माने चालला आहे. एखाद्या बाळंत झालेल्या बाईला सांगितले की हे मूल तुझा शत्रु आहे. तू त्याला दूध पाजू नकोस. त्यामुळे तू अशक्त होशील, म्हातारी होशील, तुझे सौन्दर्य कमी होईल, हे मूल तुला काळ ठरणार आहे. तर त्या मुलाची आई हे ऐकेल काय ? ती कितीही दुःख झाले, आजारी असली तरी मुलाला दूध पाजील. मुलाचे प्रतिपालन करणे हा तिचा धर्म आहे. जगाचे सर्व व्यवहार धर्माने चालले आहेत.

पुण्यातील लोक अर्धपोटी राहून खाना घेऊन (जेवणाचे डबे) जात असतात. बिरयाणी, पुलाव अशा प्रकारचे जेवण असते. पण ते लोक कर्तव्य बुद्धिने व प्रामाणिकपणे डबे पोचते करतात. म्हणून धर्म हा सर्वांनी पाळला पाहिजे. तो सतधर्म पाहिजे. अधर्म नको-तो सुकर्म पाहिजे, दुष्कर्म नको.

धर्मासंबंधी लोकांच्या मनावर किती परिणाम आहे, हे स्वत: जाऊन बघायला पाहिजे. मी नुकताच ब्रह्मदेशाला जाऊन आलो. तिकडे काही गोष्टी आश्चर्यकारक आहेत. तिथे दर्जात कमी अगर जास्त असा भेदभाव नाही. कोणत्याही प्रकारच्या उच्चनीच भावनेला, वासनेला थारा नाही. जातीयतेला थारा नाही. तिथं खरी खरी लोकशाही नांदत आहे. त्यांची घरे म्हटली म्हणजे टेबल किंवा खाटेसारखी वाटतात. १५-२० फूट आकाराची. वरती लाकडे व त्यावर चटया लावलेल्या असतात. भिंती, विटा, चुना, लोखंड वगैरे पाहिजे तितकी काळजी आपल्याकडे घेतली जाते. त्यांच्या घराचा दरवाजा चटयाचाच असतो. लाथ मारली तर ही घरे कोसळून पडतील.

तेशील लोक संध्याकाळी ६ वाजता जेवतात. संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत ते भटकतात. तेथील चहाची दुकाने बंद झाली की ते चहाचं सामान जेथल्यातेथेच ठेवतात; परंतु सामानाची चोरी होत नाही. आपल्याकडे सिमेंटमध्ये लोखंड घातलेल्या भिंतीसुद्धा चोर फोडतात. (हंशा)

दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मी लोक पैस! जपून ठेवत नाहीत. खायचं व दानधर्म करायचा, हाच पैशाचा उपयोग. त्यांचा बँकेत पैसा नाही. बुद्धाचं सांगण आहे की काहीच नित्य नाही.