१५-२-१९४६ माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे - Page 49

माझा स्वराज्याला बिलकूल... .. . पुरेसा हिस्सा पाहिजे ११

अलिकडे सगळेजण स्वराज्य मागत आहेत. पण विचार करा की, ते कोणाचे स्वराज्य आहे ? आम्ही स्पृश्यांना विचारतो की, तुमचे राज्य आमच्यावरच का ? आम्हालाही आमचे स्वराज्य व न्याय हक्क नकोत का ? हिंदुंचे स्वराज्य म्हणजे शुद्ध पेशवाई ! पेशवाई तरी स्वराज्यच होते ना ! मग त्यात आमचा कितीतरी छळ झाला. अस्पृश्य माणसाची थुंकी रस्त्यावर पडून विटाळ होऊ नये म्हणून त्याच्या गळ्यात गाडगे बांधले व त्याची पाऊले उठलेल्या धुळीच्या स्पर्शाचा विटाळ होऊ नये म्हणून पाठीशी खराटा लटकविला व ओळखण्यासाठी गळ्यात काळा दोरा बांधला. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणूनच माझे भांडण आहे.

माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही. पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे. अधिकाराच्या व माऱ्याच्या जागी आमची माणसे हक्काने आली पाहिजे. गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघासाठी मी भांडलो, स्पृश्यांनी निवडलेली माणसे आम्हाला प्रतिनिधी नकोत म्हणून मी आग्रह धरला. अखेर मी विजयी झालो व स्वतंत्र मतदारसंघ मिळविला. पण गांधींना पोटदुखी उठली, अस्पृश्यांना स्वाभिमानाचे हक्क जे मिळाले ते दृष्टपणाने हिरावून घेण्यासाठी त्यांनी आमरण अन्नसत्याग्रह केला व आपले हक्क हिरावून घेतले. त्यामुळे आपल्याला फारच कमी हक्क मिळाले, आपल्या बुरुजाला जी भेग पाडली आहे तीत संघटनेचा चुना वगैरे घालून आपण ती भरून काढली पाहिजे. आपले सरकारी अधिकारी पाहिजेत, मंत्री पाहिजेत, मध्यवर्ती सरकारातही मंत्री पाहिजेत. असे असता ७ प्रांतात काँग्रेस मंत्रिमंडळे झाली पण गांधींचा दृष्टिकोन बदलला नाही किंवा त्यांच्या हृदयात पालटही झाला नाही. परवा गांधींनी मद्रासचा दौरा काढला. तेथे अस्पृश्यांची व तुमची एवढी तेढ का असा एकाने प्रश्‍न केला. तेव्हा सरळ व स्पष्ट उत्तर न देता गांधींनी काहीतरी उडवाउडवीचे उत्तर दिले व इंग्रजांनी यांना अधिकाराची चट लावली असे उद्गार काढले. मराठे, मुसलमान, तसेच खिश्चन, अँग्लो इंडियनांना नोकऱ्या देतात त्याबद्दल गांधींचे काही म्हणणे नाही फक्त अस्पृश्यांना दिल्या की त्यांच्या पोटात दुखते असा अनुभव आहे.

हे इलेक्शन अति महत्त्वाचे आहे. इंग्रज आपली सत्ता काढून घेऊन लोकांना सत्ता व घटना बनविण्याचे अधिकार देणार आहेत. त्यासाठी एक घटना समिती बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आपले आमदार तेथे जाऊन घटनेचा व्याप ठरविणार आहेत. आपल्याला नोकऱया, शिक्षण, प्रतिनिधित्व, सत्ता, स्वतंत्र अस्तित्व, वसाहती वगैरे मागण्या निर्भीडपणे मांडणारी माणसे पाहिजेत.