४४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
रोगाचे निदान केले. जगात दुःख आणि दारिद्र्य हे महाभयंकर'रोग आहेत हे या चिकित्सेनंतर शोधलेले उत्तर होय. यालाच बौद्ध धर्माचे अधिष्ठान (₹00॥१४) म्हणता येईल. आता प्रश्न उपस्थित होतो की, दुःख आणि दारिद्र्य हे रोग कोणता धर्म नाहिसा करील ? जो धर्म हे दुःख आणि दारिद्र्य नाहीसे करण्याचा प्रभावी आणि परिणामकारक मार्ग दाखवू शकत नाही, तो धर्मच होऊ शकत नाही. कारण धर्म हा समाज धारणेसाठी आहे.
इतर धर्ममतात मेल्यानंतर काय होईल याचाच विचार केला आहे. तेवढीच एक चिकित्सा ते करीत बसले, मेल्यानंतर स्वर्ग मिळायचा का नरकात जायचे, ही भीती आयुष्यभर लोकांच्या मानगुटीवर, सिंदबादच्या पाठकुळीवर घट्ट बसलेल्या म्हाताऱ्यासारखी बसवून ऐदी, ऐतखाऊ, धूर्त लोकांचे धर्म हे एक कुरण झाले. मेल्यानंतरच्या स्थितीची काल्पनिक चित्रे रंगवून भय निर्माण करून लोकांना नाडायचे व स्वतःची वंशपरंपरा चैन चालू ठेवण्यासाठी एक व्यवसाय लबाड लोकांना मिळाला. मेल्यानंतर काय व्हावयाचे ते होईल. परंतु जे कष्टमय आहे ते सुखमय करण्याचा प्रश्न या जीवनानंतरच्या काल्पनिक प्रश्नांचा खल करून कसा सुटणार ? त्या दृष्टिकोनातून पाहाता एकटे भगवान बुद्धच वास्तववादी होते. त्यांनी दुःखाची कारणे शोधली. ती कारणे तीन प्रकारची आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक.
आध्यात्मिक म्हणजे वैयक्तिक. व्यक्तिने स्वतःच्या वागणुकीने ओढवून घेतलेले दुःख, आपल्या कर्मामुळे उत्पन्न झालेले दुःख. दारुड्याने दारु पिऊन स्वतःच्या संसाराची धुळधाण आणि शरीराची राखरांगोळी स्वत:च्या हाताने करणे याला आध्यात्मिक दु:ख म्हणावे.
` आधिभौतिक म्हणजे सामुदायिक दुःख. विषम वागणुकीमुळे आणि अन्यायामुळे ओढणारी संकटे, जसे अस्पृश्यांना होणारी सामाजिक दुःखे, समानसंधी प्राप्त न होणे यांचा यात समावेश करता येईल.
आधिदैविक म्हणजे नैसर्गिक. रेल्वे, विमान, आगबोट, मोटार अपघातामुळे,
वादळ, महापुरादी आपत्तीमुळे निर्माण होणारी दुःखे. वैयक्तिक आचरणामुळे
ओढवणारी दुःखे नाहिशी करण्यासाठी पंचशील हे साधन सांगितले
आहे. कोणाचा जीव घेऊ नकोस, चीज-वस्तु चोरू नकोस, खोटे बोलू नकोस,
व्यभिचार करू नकोस आणि दारू अथवा अन्य मादक पदार्थांचे सेवन करू
नकोस. हे पाच नियम पालन केले तर ही दुःखे निर्माणच होणार नाहीत.