४४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कोणताही प्रश्न विचारला की, बड्याबड्या ऋषींनी कानांवर हात ठेवले. याज्ञवल्क्य ऋषीला विचारले, तुम्ही आत्मा म्हणता तर आत्मा कोठे आहे ? उत्तर मिळाले नेति, नेति. बरे, आत्म्याचे मृत्यूनंतर काय ? तरी देखील नेति, नेति. म्हणजे मला माहीत नाही. हे माहीत नसेल पण आत्म्याचा आकार तर माहीत असेल म्हणून प्रश्न केला. आत्मा ताडाच्या झाडाएवढा आहे का? तरी नेति, नेति. म्हणजे नन्नाचा पाढा.
आत्म्याचे स्थान कोणते, त्याचा आकार कसा आहे, पुढे त्याचे काय इत्यादिबद्दल काही माहिती नसताना आत्म्याबद्दल इतकी वायफळ गडबड झाली आहे की, नुसत्या सतत प्रचाराने एका केवळ काल्पनिक वस्तुच्या अस्तित्वाचा मोठ्या हिरीरीने पुरस्कार केला जात आहे. प्रेयसीचे नाव माहित नाही, गाव जाणत नाही, रंग-रूप, वयाची कल्पना नाही पण माझे तिच्यावर प्रेम आहे हो. असे सांगणाऱ्या मूर्ख प्रेमवेड्यासारखी स्थिती आत्म्याचे अस्तित्व मानणारांची आहे.
खरे पाहता, आत्मा नाही, हे सिद्ध करीत बसण्याची आवश्यकताच नाही. आत्मा आहे असे प्रतिपादन करणारांनी तो असल्याचे सिद्ध करणे ही त्यांची जबाबदारी आहे. आत्मा नाही हे सत्य. आत्मा आहे हा प्रचार भ्रम आहे.
आत्मा सिद्ध करण्यासाठी पुनर्जन्माचे घोडे पुढे दामटण्यात आले. शरीर नाशवान आहे ते सोडून आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो वगैरे भाकडकथा निवेदन केल्या जातात. शरिरातील एकूण एक भाग चीरफाड केल्यावर दिसू शकतो, मग हा आत्माच का नाही शरीरातून काढून दाखवित ? चांगले निष्णात शस्त्रवैद्य आहेत. त्यांना जाऊन विचारा ? सांगा म्हणावे आत्मा कोठे आहे तो ? काढून दाखवा शरीरातून ?
बौद्ध तत्त्वज्ञानात पुनर्जन्म मानण्यात येतो असा दाखला लागलीच देण्यात येईल, परंतु त्या सिद्धांताचा आत्म्याशी कोणताच अर्थाअर्थी संबंध नाही. बौद्ध पुनर्जन्म सिद्धांत म्हणजे पुननिर्मिती. निसर्गाची पुनरावृत्ती. पित्याच्या आकारासारखा चेहऱ्यामोहोऱ्याचा पुत्र होतो म्हणून तो काही संपूर्णपणे पिता नाही. याला बौद्ध तत्त्वज्ञानात पिता पुत्राच्या रूपाने जन्म घेतो असे म्हटले आहे. परंतु पित्यातील सर्व गुणांचा वास पुत्राच्या ठिकाणी राहू शकत नाही. कारण त्याबाबतीत पित्याबरोबर मातेचे गुण त्यात येतात. शिवाय वातावरणाचा परिणाम होतोच. एका आंब्यापासून दुसरा आंबा निर्माण