४४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पूर्व जन्माच्या कल्पनेमुळे पापकर्मे करण्याला उत्तेजन मिळालेले आहे. मागच्या जन्मात साठवून ठेवलेले पुण्य आहे मग आता पाप करायला काय हरकत आहे असे एखादा खाऊनपिऊन बरा असा गृहस्थ आपल्या मनाशी विचार करतो. पण असा माणूस हा मानवजातीला अपायकारक असतो. पतित दोन प्रकारचे असतात. एक पतित ज्याला आपण पतित आहोत याची जाणीव असते व त्याची बोचणी लागलेली असते. दुसरा पतित ज्याला आपल्या पापकर्माबद्दल काहीच वाटत नाही. जसा एखादा मारखाऊ कोडगा असतो तसा.
ज्या पतिताला आपल्या स्थितीची जाणीव असते व बोचणी लागते तो आपल्या पतित अवस्थेतून वर येण्यासाठी धडपड करतो. तो या जाणीवेमुळे स्वत:चा उद्धार करू शकतो. परंतु दुसर्या प्रकारचे पतित सुधारूच शकत नाही. कारण त्याची मानसिक ठेवणच तशी असते.
अशाप्रकारे आपल्या अधःपतनाबद्दल खंत वाटणाऱ्यांना मार्ग दाखविण्याचे कार्य करण्यासाठी समाजसेवकांची जरूरी आहे. समाजाला वैचारिक भूमिका देण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्य करण्यासाठी सेवकांची जरूरी आहे. गरीब समाजाला त्यांना मेहनताना देता येणार नाही. पण त्यांच्या पोटापाण्याची सोय करता येईल. अशा कार्यकर्त्याना ऐतखाऊ म्हणता येणार नाही. कारण हजार आकर्षणे सोडून समाजसेवा करावी लागते.
बौद्ध भिख्खुंची संघटना ही अशाच समाजसेवेसाठी भगवंतानी निर्माण केली आहे. हे सतीचे वाण आहे. ते स्वीकारून भगवान बुद्धानी दाखवून दिलेल्या मार्गाने जाण्याने आज जगाचे कल्याण होईल. मानवतेचे हित होईल.