१५-२-१९४६ माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे - Page 50

१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

स्पृश्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे लोक नको आहेत. जर कॉंग्रेस तिकिटावरची माणसे कोणाचीही भाडभीड न ठेवता आमच्या मागण्या मांडतील तर मी त्यांना पाठिंबाच देईल. पण ती माणसे स्पृश्यांचे गुलाम आहेत. अस्पृश्यांच्या हिताकडे न बघता स्वार्थाकडे बघणारी आहेत. त्यांना आपण पाडले तर फारच चांगला परिणाम होईल. ज्याप्रमाणे धनी आपल्या कुत्र्याला कोठे दुसरीकडे जाऊ नये म्हणून पट्टा लावून बांधतो त्याप्रमाणे काँग्रेसचे तिकीट म्हणजे पितळेचा पट्टा आहे. काँग्रेसला जवळ उभे करू नका. काँग्रेसचा उमेदवार आपला शत्रू आहे. तो पराधीन आहे. आपली माणसे पराधीन होता कामा नयेत. म्हणून तुम्ही दक्ष राहा,

पराधीनतेने नुकसान कसे होते याचे एक प्रत्यक्ष घडलेले उदाहरण सांगतो. फलटणच्या काही महारांना ४ चाहूर जमीन होती. पण काही कारणानिमित्त तेथील राजा एका देवळात दररोज ५०० ब्राह्मणांना पंचपक्वान्न जेवू घालीत होता, राजवाड्यातून दररोज गाड्या भरून अन्न येत असे व महार लोक तेथील उष्ट्या अन्नावर दररोज अवलंबून राहिल्यामुळे शेती करीत नव्हते. महारांच्या जमिनीवर जंगल उगवून त्या जमिनी इतर मराठ्यांनी तशाच कब्जात घेतल्या. पुढे ६०/७० वर्षांनी राजा शहाणा झाला व त्याने ब्राह्मणांचे जेवण बंद केले. महारांचेही उष्टे बंद झाले. पुढे एक म्हातारा आपली जमीन मिळवून द्या म्हणून माझ्याकडे कागदपत्र घेऊन आला. पण १८७४ च्या आधी जमिनी गेल्यामुळे काही करता आले नाही. अशाप्रकारे खरकट्यामुळे महारांच्या जमिनी गेल्या व परावलंबी जीवनामुळे हक्क गेले. तेव्हा तुम्ही सर्वानी झोप सोडून डोळे उघडा व जागे राहा. वर्ष दोन वर्षातच येथे मोठे परिवर्तन

होणार आहे. इंग्रज सत्ता देईल ती सत्ता दुसर्‍याकडे न जाता आपणाकड़ेही पाहिजे. यासाठी चालू निवडणुका हा एक निर्णयाचा संग्राम आहे. कौरव- पांडवांच्या संग्रामासारखा आहे.

आपले ब्राह्मणेत्तर भिडू आता काँग्रेसकडे झुकत आहेत. आता काँग्रेस व आपली फेडरेशन यामध्येच झगडा आहे. आपण एकजूट केली, निश्‍चय व निर्धार केला तर जय आपलाच ! मेलो तरी हरकत नाही पण सम्मानाने जगू असा निर्धार केल्याशिवाय कायम स्वरूपाचा सामुदायिक बदल घडवून आणता येणार नाही.

वीस वर्षापूर्वीच्या परिस्थितीत व आताच्या परिस्थितीत जमीन अस्मानचे अंतर आहे. त्यावेळी शेकडा ९० लोक " तात्या तुमच्या गोठ्यातच राहतो " असे म्हणत असत. आज तसे म्हणणारा आपल्यातील एकही माणूस नाही,