४५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दाखवीत असे. ' डॉ. आंबेडकरांनी केलेले महाराचे नुकसान ' असा मजकूर केसरीतून येत असे. पण मी त्याला कधी उत्तर दिले नाही.
संगमेश्वरला एकदा सभा होती. महारांच्या सभेत मला या ब्राह्मणाकडून विचारणा झाली. मी जेवावयाला बसलो होतो. जेवल्यावर येतो म्हणून सांगितले. आणि त्यांना जर वेळ असेल तर त्यांनी आत यावे असे मी त्याला सांगितले. तो गृहस्थ म्हणाला. काम थोडसं आहे पण महत्त्वाचं आहे. तो म्हणाला “ तुम्ही या सर्व लोकांना सांगता मांस खाऊ नका, ढोरं ओढू नका. हे तुम्ही महारांचे नुकसान करता हे बरे का ? " मी बरे म्हणून सांगितले. मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर खाजगी देऊ की सभेत देऊ म्हणून विचारले. सभेत उत्तर द्या, असे तो म्हणाला. मी लोकांना सांगितले यांना प्रश्न विचारावयाचे आहेत. तुम्ही त्यांचा प्रश्न लक्षात घ्या. त्यांनी त्रैराशिक मांडले ; ' तुमची चळवळ नुकसानकारक आहे ' त्याने मांडलेले त्रैराशिक खरे होते. त्यांचे एक हजार रुपयांचे नुकसान होते, असा त्यांचा प्रश्न होता. मी सांगितले, मी हे तुम्हाला एक हजार रुपये द्यावयास तयार आहे आणि तुम्ही जर ही ढोरं ओढाल तर एक हजार रुपयांचे बक्षिस देण्यासही मी तयार आहे, पण त्यांच्याबरोबर तुम्ही वागायला हवं.
स्वाभिमान अत्यंत आवश्यक आहे. एखादी बाई कामाठीपुऱ्यात गेल्यावर ' पलंग, सोन्याचांदीचे दागिने आणते आणि सकाळी हाटेलवाल्याला हाक मारून सांगते, ए, अर्धा प्लेट खिमा, एक स्लाईस रोटी आण. चार वाजती चहा. संध्याकाळी पावडर लावून बसावयाचं. तिचे जीवन सुखमय असते, पण वेश्येला काही किंमत नाही, अब्रू नाही हे लक्षात ठेवा.
आम्हाला स्वाभिमानाचं जीवन हवं. त्यात दारिद्र्य प्राप्त झालं तरी हरकत नाही. मी ४८ नंबरच्या चाळीत ५० नंबरच्या खोलीत राहात असे. झोपायला जागा नाही, उशी आणि धोतर घेऊन वर गच्चीवर झोपायला जायचा. खायला प्यायला मिळतय हा प्रश्न महत्त्वाचा नाही, स्वाभिमानाच्या जीवनाला महत्त्व आहे. किडा मुंगीचे जीवन आम्ही जगणार नाही. मी बौद्धधर्मात गेल्याने काही लोक म्हणतील, पॉलिटिक्स मधला किडा गेला ! पण हा पॉलिटिक्स मधला किडा जाणार नाही. राहाणार आहे, या लोकांना घेऊन राहाणार आहे.
माझी बौद्धधर्माची कल्पना वेगळी आहे. या धर्मातील लोक वकील, बॅरिस्टर, प्रधानमंत्री होतील, अशी तरतूद हवी आहे. हा धर्म आम्हाला पुनीत करणार. पथभ्रष्ट करणाऱ्यांच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवू नये.