६-५-१९५५ बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात जमीन अस्मानाचे अंतर आहे - Page 494

४५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पुराणातील वांगी पुराणात, याप्रमाऐच होत. प्रत्यक्ष करायला सांगितले तर ते करीत नाहीत. जातीभेदाने अपरिमीत नुकसान झाले आहे. जातीभेद नष्ट करा ! अवघेची धरू सुपंथ ! पण त्यांना सुपंथ नको आहे.

बंधू आणि भगिनीनो, शिवाजीचे अष्ट प्रधान ब्राह्मण होते. त्यांची कुळकथा निराळी आहे. ते मराठ्यांना पंगतीला जेवावयाला घेत नसत. शिवाजीने बाळाजी आवजीला हे सांगितले, तो म्हणाला तुम्ही राज्याभिषेक करून घेतल्याखेरीज तुमचा दर्जा वाढणार नाही. शेवटी शिवाजीने सांगितले काय करावयाचे असेल ते तुम्हीच करा. मोरोपंत पिंगळे हा मुख्य प्रधान होता. तो म्हणाला ; ' लेका शुद्रा तू आमचा राजा होणार ! ' त्याने शिवाजीची बेइज्जत केली. शेवटी बाळाजी आवजी हा राजपुतान्याकडे गेला. तेथे त्याने शिवाजीची वंशावळी तयार केली ; आणि काशीहून ब्राह्मण आणून राज्याभिषेक करविला.

जातीभेदाच्या शेणातील किडे हे शेणातच राहतील. त्यांची शेणातून निघण्याची इच्छा नाही. त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल तेव्हा ते आपल्यामागे येतील. त्यांना असं वाटतं, दोनच माणसे हिंदू समाजातून जातील. डॉ. आंबेडकर व त्यांची बायको. परंतु बौद्धधर्मसंबंधाने मतपरिवर्तन फार झाले आहे. पुढच्या वर्षी सारनाथ येथे बुद्धशिष्य जमा होतील. त्यांच्या खर्चासाठी उत्तरप्रदेश सरकार पस्तीस लाख रुपये खर्च करणार आहे. भारत सरकार दोन कोटी रुपये खर्च करणार. उत्तरप्रदेश मागासलेला देश. त्याला पूर्वी गोंडवण-आर्यावर्त म्हणत. उत्तरप्रदेश सरकारचे पस्तीस लाख रुपये म्हणजे उगवणाऱ्या झाडाची हिरवी पाने. कोणी काही तरी केले तरी बुद्ध धर्म या देशात येणार. त्याला कोणी आड येऊ शकत नाही. या पुरामध्ये सर्व वाहून जातील. जे उलट दिशेला जातील तेही वाहून जातील. या देशातील सारी जनता अज्ञान होती. ब्राह्मणांनी पुस्तकात काय लिहिलय याची त्यांना कल्पना नव्हती. २-४ आण्याला ही पुस्तकं मिळतात. मी इथं येण्याच्यापूर्वी भागवत वाचीत होतो. त्यावरून ज्ञानवान माणसे असे कसे लिहू शकतील अशी शंका येते.

तुम्ही अज्ञान आहात. तुमच्यातली शिकलेली मुलंही अज्ञान आहेत. मी दोन-चार दिवसापूर्वी उपनिषद वाचीत होतो. त्यातील छांदोग्योपनिषदात गुरूशिष्यांचा संवाद दिला आहे. शिष्याने शंका विचारली आहे. पण शंका