१२-१२-१९५५ विद्या, प्रज्ञा करुणा, शील वमेत्री या पंचतत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे - Page 498

४५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती. आम्हाला विद्या शिकता आली नाही. आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती ; पण ती आम्हाला ब्राह्मणनी घेऊ दिली नाही. परंतु भगवान बुद्धाने हा दंडक मोडला.

एकदा भगवंतास लोहित नावाच्या ब्राह्मणाने प्रश्‍न विचारला की तू सगळयांना विद्या का शिकवितोस. यावर भगवंताने त्याला सांगितले की, ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला अन्नाची जरूरी आहे, त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरूरी आहे. ही विचारसरणी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली. (टाळया) विद्या ही एक प्रकारची तलवार आहे. ही दुधारी असते. तिने दुष्टांचा संहारही करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते म्हटलेच आहे की-

स्वदेशे पूज्यते राजा '

विद्वान सर्वत्र पूज्यते ।!

तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात; पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. विद्येबरोबर भगवान बुद्धानी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचरणानं संपन्न असं आचरण, करूणा म्हणजे सर्व मानव जातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयीची आत्मियता, या चार पारमिता असल्या पाहिजेत. तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्योबरोबरच मानवाजवळ जर करूण नसली तर तो कसाई आहे. असं मी समजतो. करूणा म्हणजे माणसामाणसावरचं प्रेम ' ह्याच्यापुढेही मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे. ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धानीच होय. मी माझ्यासारखा विद्वान भारत वर्षात पाहू इच्छितो.

सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धाचा बौद्ध धर्म होय. इतर धर्म निरर्थक आहेत. माझ्या धर्मात ईश्वराला मुळीच वाव नाही. कारण लोक सांगतात की, ईश्वराने सृष्टी निर्माण केली व त्याने नकारापासून साकार व साक'रापासून नकार उत्पन्न केले. पण या जगात साकार वस्तु अगोदर होत्या व आहेत. ईश्वर असता तर त्याने इकडे डोळेझाक केलीच नसती. म्हणून ईश्वर आहे, ही कल्पनाच मुळी खोटी आहे. जर देव (परमेश्वर) असलाच तर . आडिनरी जीवनात त्याचा उगीच खुंटा कशाला? माझ्या धर्मात आत्म्यालाही स्थान नाही. बौद्धधर्माचा मूळ पाया दुःख दूर करणे हा आहे. तोच धर्म माझ्या मते सर्वश्रेष्ठ होय. इतर धर्म मनुष्य व ईश्वर यांच्या काल्पनिक संबंधावर भर देऊन आधारलेले आहेत.