१५-२-१९४६ माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे - Page 51

माझा स्वराज्याला बिलकूल . . . . . पुरेसा हिस्सा पाहिजे १३

ही आनंदाची गोष्ट आहे. महाराला पूर्वी कायदेमंडळाच्या इमारतीत झाडूवाल्यांचेच काम होते. पण आज माझी १५ माणसे कायदेमंडळात सभासद आहेत व इतरांच्या मांडीला मांडी लावून मानसन्मानाने ती तेथे बसत आहेत. आज ना उद्या ती मंत्रीही होतील. म्हणून हे इलेक्शन फार महत्त्वाचे आहे. ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर निवडणुकीस उभे राहतात ते मानासाठी पण तुम्हा आम्हाला कायदेमंडळात जावयाचे ते ज्या जात्याखाली आपण भरडले जातो त्या जात्याचा खुंटा आपले हाती आणण्यासाठीच ! जोर जुलूम टाळणे हे आपले तेथे जाऊन करण्याचे काम आहे. आपल्या जवळ पैसा नाही, आपण बलवान नाही, म्हणून आपल्याला राजकोय सामर्थ्य पाहिजे. आमच्या संमतीने राज्यकारभार चालला पाहिजे. तेव्हा ज्याला मत असेल त्याने त्या मताचा अमोलिक वस्तुसारखा उपयोग केला पाहिजे. मत म्हणजे ईश्वराने दिलेला " संजीवनी मंत्र " आहे. त्याचा योग्य उपयोग केला तरच आमचे संरक्षण होईल. स्वाभिमानी जीवनाचा तो एक तरणोपाय आहे, त्याची जोपासना करा. या दृष्टीनेच या इलेक्शनचा विचार करा,

आपण कायदेमंडळातही अल्पसंख्याक आहोत. १७५ मध्ये आपण १५ आहोत, या संख्येवर कार्य करणे कठीणच ! तेव्हा या १५ ची आता २०, २५ माणसे आपण निवडून आणली पाहिजेत. म्हणूनच आपण जनरलच्या जागाही लढवीत आहोत. दक्षिणभागाला मे. इनामदार यांना उभे केले आहे. आपण सर्वांनी त्यांना चारही मते दिली तरच आपल्याला यश येईल. १०,००० मते आहेत. १०,००० जणांनी तरी त्यांना मते दिली पाहिजेत, प्रत्येकाला ४ मते व ४ जागा आहेत. तरी सर्वानी ही जबाबदारी ओळखली पाहिजे, आपल्या विरोधकाजवळ पैसा आहे. आपल्या विरोधकांनी काळ्या बाजारात मिळविलेला पैसा पापक्षालनार्थ ते काँग्रेसला निवडणुकीसाठी देत आहेत. पण पैशावर जर आपण राजकारण खेळू लागला तर आपणाला राजकारण सोडावे लागेल व राजकारणाचा खेळखंडोबाच होईल. आपले अस्पृश्य लोक कॉंग्रेसच्या मागे नाहीत. इतर लोक पैशास भुलून काँग्रेसच्या मागे लागतात, कारण काँग्रेसला जर लोक मानतात तर मग काँग्रेसचे इलेक्शन कवडीही खर्च न होता झाले पाहिजे. १९३७ साली माझ्या विरोधकाने ३५,००० रुपये खर्च केले. माझा खर्च फकत जरुरीपुरता अवघा ९०० रुपये इतकाच होऊन जवळजवळ माझा पहिला नंबर आला याबद्दल मला धन्यता वाटते. म्हणून राजकारण कोणाला कळत असेल तर ते अस्पृश्यांना असे म्हणावे लागते. बाकीचे राजकारण स्वतःकरिता करतात. समाजाचे किंवा देशाचे हित त्यांच्यापुढे

नसते !