१५-२-१९४६ माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे - Page 52

१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मी गेल्या २० वर्षे सतत राजकारण करीत आहे व खोलवर त्याचा अभ्यासाही करीत आहे. माझे राजकारण कधीच फसलेले नाही. मी राजकारणाच्या पाण्यात पूर्ण डुंबलो आहे. म्हणून माझे राजकारण खरे, प्रामाणिक व स्वभावजन्य आहे. इतर लोक पाण्याच्या कडेला उभे राहून नुसत्या उड्या मारून मजा पाहतात. त्यांना अनुभव नाही. आपले तसे नाही. तरी आपण सर्वानी जागरूक राहून विरोधकांच्या कसल्याही भूलथापांना, धाकदपटशांना भीक न घालता समाजाच्या उद्धाराचे पवित्र कर्तव्य आपली चारही मते आपल्याच उमेदवारास देऊन बजावावे. मला सांगावयाचे ते सांगून मी माझे कर्तव्य केले आहे. तुम्ही सर्वजण तुमचे कर्तव्य पार पाडाल अशी मला आशा आहे.