२५-५-१९५६ बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही - Page 510

४७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

भारतात जर एकही बुद्धधर्मीय नाही तर आज २५०० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या भगवान बुद्धाची आम्हाला उत्कट आठवण का होते ? बौद्धधर्माचे हे मढे उकरून काढून आम्ही त्याची का पूजा करीत आहोत ? भगवान बुद्धाच्या धर्माला सर्वत्र मागणी आहे. बुद्ध धर्माचा प्रचार नुसत्या भारतातच नसून सर्व जगात आहे. धर्म प्रसाराच्या व्यापारात रामकृष्णाला फारसे स्थान नाही.

बुद्ध धर्मावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात. त्यापैकी सावरकर एक होत. वास्तविक त्यांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाईट मनुष्य आहे, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय ? बौद्ध धर्म प्रचारक राजे वाईट होते, असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडादी. मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिद्ध केलेल्या ' बौद्धांच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद ' या लेखातून त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे, त्यांना उत्तर देण्याची माझ्यात हिम्मत आहे.

भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्षूसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राह्मण होते. हे सावरकरांना माहीत आहे काय ? सारीपुत्त मोग्गलायनसारखे पंडित ब्राह्मण होते, हे सावरकरांनी विसरू नये. सावरकरांना मला असा प्रश्‍न विचारायचा आहे की पेशवे कोण होते, ते भिक्षु होते काय ? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले ? तेव्हा अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले. पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले ! कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्‍चित आहे. मी बुद्ध धर्म स्वीकारणार ! तुम्हाला पटला तर तुम्हीही स्वीकारा. आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली. परंतु आता बुद्ध धर्माची लाट येईल, ती कधीही परत जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल, पण ओहोटी येणार नाही. भगवान बुद्धाच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या. काही छिद्रे राहिली होती. म्हणून त्या दिद्रांद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बुद्ध धर्माचा प्रवाह थोडा दूषित झाला होता. परंतु आता मी त्या धर्माची डागडुजी करून ती छिद्रे बुजविणार आहे. |

बुद्ध चरित्रावर मी जे पुस्तक लिहिले आहे त्यात बुद्धाचे स्थान काय आहे याचे संपूर्ण विवेचन केले आहे. खिश्‍चन धर्मात येशू स्वत:ला ईश्वराचा पुत्र समजतो. किंबहुना तो बायबलमधून असेही सांगतो की, मी तुम्हाला ईश्वराचा संदेश सांगत आहे. तुम्ही मेल्यानंतर जेव्हा स्वर्गात जाल तेव्हा मला