३४०
स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे
निर्भय नागरिक व्हा!
दिल्ली येथे ता. १० जून १९५६ रोजी आंबेडकर भवनाच्या पटांगणात सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात तीस हजारांच्यावर समुदाय हजर होता. ही सभा २५०० वा बुद्ध महापरिनिर्वाण, जयंती आणि संबोधी दिन साजरा करण्याकरिता भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्ली येथील शाखेमार्फत बोलावण्यात आली होती. कंबोडियाचे आदरणीय वीर धर्मवीर महाथेरा हे या सभेचे अध्यक्ष होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
बंधु आणि भगिनींनो,
ब्राह्मण धर्म हा अन्याय, निर्दयता आणि गरिबांची पिळवणूक यांचे माहेरघर आहे. वर्णव्यवस्थेत सर्वात वर ब्राह्मण असून त्यांच्या खाली क्षत्रिय नंतर वैश्य व सर्वाचे ओझे डोक्यावर असलेला शूद्र सर्वात खालच्या रांगेत आहे. जर शूद्राला आपली उन्नती करून घ्यावयाची असेल तर त्याला तिन्ही वरच्या वर्णाशी झगडा करावा लागेल. या तिन्ही वर्णाना स्वतःच्या कल्याणाची मुळीच काळजी कराविशी वाटत नाही. धर्म ग्रंथांनी ब्राह्मणांकडे वैश्य-क्षत्रियांपेक्षा श्रेष्ठत्त्व दिले असल्यामुळे ते अक्षरशः ब्राह्मणवर्गाचे धार्मिक गुलाम आहेत. साध्या शब्दात सांगायचे म्हणजे शूद्राच्या प्रगतीआड येणारे हे तीन वर्ण त्याचे शत्रु आहेत.
ज्या समाजव्यवस्थेत धार्मिक पिळवणूक होत असेल तेथे तुम्ही प्रगतीची कशी अपेक्षा करू शकता ? याच कारणामुळे शूद्राला नेहमी टाचेच्याखाली ठेवण्यात आले आणि जेव्हा जेव्हा शूद्रांनी विरूद्ध लढण्यासाठी कंबर कसली तेव्हा तेव्हा त्यांची मुंडकी उडविण्यात आली.
याउलट बौध्द धर्माकडे पाहा. येथे जातीयतेला आणि विषमतेला थारा नाही. सर्व अधिकार समसमान. सर्वांना धर्मात सारखे अधिकार. कोणी उच्च नाही अन् कोणी नीच नाही. स्वतः बुध्दाने अन्यायाविरूद्ध झगडून ' बहुजन हिताय, बहुजन सुखाय ' अशा धर्माची स्थापना केली.
प्रबुद्ध भारत : २१ जुलै १९५६.