४७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अशी बुद्ध धर्माची शिकवण नाही. बौद्ध धर्मात अनाकलनीय वस्तु अथवा वर (बक्षिस) यांना स्थान नाही. ज्या वस्तुंची माणसाला जाणीव होऊ शकेल, ज्यांना स्पर्श करू शकेल, ज्यांच्याविषयी बोलू शकेल आणि ज्यांचा माणूस नाश करू शकेल अशाच वस्तु किंवा गोष्टींविषयी बुद्धाने उपदेश केला आहे.
प्रत्येकाला धर्माची परीक्षा करुन त्याची तपासणी करता आली पाहिजे. बाजारात सराफाच्या दुकानी आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो. तेव्हा तुम्ही काय करता ? तुम्ही हे पाहाता की, हे सोने खरे आहे की खोटे ? हे समजून घेण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहाण्यात येतो. तसेच धर्माला ' कस ' लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे, धर्म तत्त्वांची छाननी करून, सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहू या की कोणता धर्म माणसाला सुखसमाधान देऊ शकेल ?
या दृष्टिकोनातून पाहिल्यास मानव समाजाच्या अस्तित्वाला ब्राह्मणी धर्म नुसता विघातकच नाही तर भयंकर विषारी आहे. महाराष्ट्रात देवगिरीच्या रामराव यादवांचा पंतप्रधान हेमाडपंत नामक ब्राह्मण होता. त्याने आचारविधीः कर्मकांडांचे सातशे प्रकार आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. एका वर्षात दिवस ३६० च असतात. मग हे सातशे विधी कशासाठी ? हेमाडपंत ब्राह्मण असल्यामुळे त्याने. हे सातशे ' आचार ' लिहून ठेवून ब्राह्मणांच्या पोट भरण्याची परस्पर सोय करून ठेवली आहे
दुसरा तसाच प्रकार सत्यनारायण कथेचा ! ही ' सत्यनारायणाची कथा ' दुसरे तिसरे काही नसून ब्राह्मणांच्या शिधा/भोजनाची सोय करून ठेवण्यासाठी कोणा ब्राह्मणाच्या सुपीक मेंदुतून निघालेला शोध आहे. सत्यनारायण पूजेचा समारंभ पाहिला तर तुम्हाला आढळून येईल की सत्यनारायणाला अर्पण करण्यासाठी ज़ी मेवामिठाई आणि फळफळावळे असतात ती फक्त ब्राह्मणांच्याच खाण्याच्या उपयोगी असतात. एखाद्या जातीबरोबर पंगतीत आपण जेवावे की नाही हे ठरविण्याचा अधिकार ब्राह्मणाचा. आपल्यापेक्षा नीच समजून ब्राह्मणाने त्या जातीने तयार केलेले भोजन जेवण्यास नकार दिला तर ब्राह्मणाला त्या बदली अंदाजे वीस रुपये आणि काही फळफळावळे प्राप्त करून घेता येतात. तो ब्राह्मण ते जेवण्याच्या बदली मागतोच. शूद्राने तयार केलेले जेवण त्याला चालत नाही. परंतु त्याच्याऐवजी स्वतःच्या घरी शिजविता येईल अशी सर्व शिधासामग्री ब्राह्मण त्या शूद्राच्या घरून गोळा करून घेऊन जातो. शूद्राने कितीही प्रवित्र सोवळ्याने त्याच शिधासामग्रीचा उपयोग करून जेवण तयार केले तर ते चालत नाही. कारण अशी शिधासामग्री त्याच्या पाच दहा दिवसांची सोय करून देण्याइतपत असते.