१६-२-१९४६ मार्याच्या जागा काबीज करा (????) - Page 53

२३६

माऱ्याच्या जागा काबीज करा !

भारतीय अस्पृश्य वर्गाचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तारीख

१६ फेब्रुवारी १९४६ रोजी बेळगाव जिल्ह्यातील काही प्रमुख गावांना धावती मेट दिली. शेडबाळ येथे जमलेल्या लोकांना डॉ. बाबासाहेबांनी निवडणुकीच्या संबंधात थोडासा उपदेश केला, तद्नंतर ते गळी या गावी गेले. तेथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाला उद्देशून त्यांनी अस्पृश्य समाजावर पडलेली जबाबदारी किती महत्त्वाची आहे याची स्पष्ट जाणीव करून दिली. पुढे मग सोळी व अथणी या गावांना भेटी देऊन संध्याकाळी ५-३० च्या सुमारास निपाणी येथे त्यांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

निपाणी हायस्कूलच्या विस्तीर्ण मैदानात डॉ. आंबेडकर भाषण व्हावयाचे असल्यामुळे, तेथे सभेपूर्वीच चिक्कार गर्दी लोटली होती. सभेच्या बंदोबस्ताचे काम समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी उत्तम प्रकारे सांभाळले होते. सुमारे १,००० गणवेशधारी समता सैनिक हातात काठ्या व भाले घेऊन आपापल्या नियोजित स्थळी सज्ज होते. त्यांना पाहून प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरणे स्वाभाविक होते. स्वयंसेवकांच्या कडक बंदोबस्तामुळे सभेचे काम निर्विघ्नपणे पार पडले. स्वयंसेवकांनी बजावलेल्या या समाजसेवेबद्दल कोणीही त्यांना धन्यवादच देईल हे निःसंशय आहे.

सभेच्या नियोजित स्थळी डॉ. बाबासाहेबांचे आगमन होताच, त्यांच्या नावाचा प्रचंड जयघोष होऊन टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि क्षणार्धात सर्वत्र शांतता पसरली, प्रथमार॑भी स्वागतगीते व प्रास्ताविक भाषण

झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले,

' प्रिय बंधु-भगिनींनो,

मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीसंबंधी आज अस्पृश्य वगाचे कर्तव्य कोणते हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. या विधिमंडळात प्रतिस्पर्ध्यांशी झगडून आम्ही १५ जागा मिळविल्या आहेत. त्या सर्व जागांवर आपण आपलेच लोक निवडून दिले पाहिजेत. तसे न झाले तर आपल्यावर पस्तावण्याची पाळी येईल याची खूणगाठ बांधा, कॉग्रेस ही आपला हितशत्रू आहे,

गरुड : ३ मार्च १९४६.