४८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हिंदू आणि बौद्ध धर्मात महान अंतर आहे. मी ते सर्व तुम्हाला समजावून देतो. मिलिन्द राजाने भिक्खु आचार्य नागसेनाशी केलेली चर्चा प्रश्नोत्तर रुपाने ' मिलिन्द पन्ह ' ग्रंथात दिलेली आहे. त्याची आठवण मला या प्रसंगी झाली आहे. मला लोक विचारतात भारतातून बौद्ध धर्म का विलयाला गेला ? असाच एक प्रश्न मिलिंद राजाने भिक्खु नागसेनला विचारला होता. मिलिद राजा म्हणाला, धर्माचा ऱ्हास का होतो ? तेव्हा आचार्य नागसेन यांनी उत्तर दिले होते की धर्म ऱ्हासाची तीन कारणे आहेत :--
(१) जो धर्म तात्कालिक (सामयिक) असतो, म्हणजे त्या काळापुरता असतो तो विलयाला जातो. ज्या काळापर्यंत धर्म जनमनाची पकड घेतो, तोपर्यंत तो
धर्म राहातो.
(२) जर धर्मोपदेशक विद्वान नसतील आणि जर चर्चेच्या प्रसंगी ते आपल्या धर्माचे उत्तमरितीने प्रतिपादन करून यशस्वी होऊ शकत नसतील, तर तो धर्म विलयाला जातो
(३) जेव्हा सर्वसाधारण माणूस खऱ्या धर्मावर विसंबून राहात नाही केवळ नक्कल करतो त्यामुळे धर्म विलयाला जातो. कारण नक्कल चिरंतन नसते.
भारतातून बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची जी कारणे आहेत त्यांच्याशी या कारणांचा सरळ संबंध नाही. मी या संबंधात कोणाशीही चर्चा करायला तयार आहे.
मी तुम्हाला सांगतो की जगातील अखिल मानवाच्या कल्याणासाठी सदासर्वकाळ फक्त बौद्ध धर्मच राहील. मुसलमानांनी या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून बुद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्यांना ' बुत शिकन् ' म्हणजे मूर्ती फोडणारे म्हटले जाते. यातील ' बुत ' हा मूर्तीसाठी शब्द आहे. तो ' बुद्ध ' या मूळ शब्दाचे विकृत (अपभ्रंश) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहीत आहे.
एके काळी अफगाणिस्तान हा संपूर्ण बौद्ध देश होता. आक्रमक मुसलमानांना तेथे पिवळी वस्त्रे परिधान केलेले लोक इकडून तिकडे जाताना आढळले. मुसलमान सरसेनापतीने त्यांना इस्लामी धर्माचा स्वीकार करण्याचा निरोप पाठविला. पण भिक्खुंनी तसे करण्यास नकार दिला. एक दिवस हा सरसेनापती अरण्यातून जात असताना त्याला तेथील झाडावर माणसांची मुंडकी लटकलेली आढळून आली व आश्चर्य वाटले. जवळजवळ सातशे बौद्ध भिक्षुंची कत्तल करून त्यांची डोकी झाडावर टांगण्यात आली होती. हे पाहून आपल्या हुकूमाची चुकीची अंमलबजावणी झाल्याचे पाहून त्या सरसेनापतीला फार खेद झाला. तोपर्यंत आपला जीव व धर्म वाचविण्यासाठी सर्व भिक्खु पुढे चीन, तिबेट आणि इतर देशात पळून गेले होते. तेच भिक्खु पुढे जपानला गेले.