१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 523

बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ४८३

` गेली हजार वर्षे जे काळेकुट्ट ढग जमले होते ते या अडीच हजाराव्या बौद्ध वर्षाच्या विजयादशमीला धर्मचक्र नवप्रवर्तन करून डॉ. बाबासाहेब नष्ट करणार आहेत. हिंदू धर्माच्या सीमामध्ये बंदिस्त अस्पृश्य समाज या दिवशी त्यांना शतकानुशतके गुलाम ठेवणारी धार्मिक तटबंदी उल्लंघून नव स्वातंत्र्याचे उदक पिण्यास तयार होणार आहे. हेच ते खरे सीमोल्लंघन. ते केल्यावर परत यावयाचे नाही, या भीम निश्चयाने प्रत्येक अस्पृश्य दलिताचे पाऊल पुढे पडणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध-धर्म-दीक्षा समारंभ ब्रह्मदेशचे महास्थविर पूज्य भिक्षु चंद्रमणी संपन्न करणार आहेत. त्याचवेळी लाखो लोक बौद्धधर्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरला एकत्र येतील

नागपूर शहरात पूर्व दिशेकडून रायपूर, दुर्ग, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातून धर्म स्वीकारणारे इच्छुक बौद्धजन प्रवेश करतील, पश्‍चिम दिशेकडून वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातून येणारे धर्मप्रवासी प्रवेश करतील. तर दक्षिणेकडून मराठवाडा, चांदा, बल्लारशहा या विभागातील बौद्ध यात्रेकरू येतील आणि उत्तर दिशेकडून उत्तर प्रदेश, मध्यभारत, [भोपाळ, ] हुशंगाबाद, बैतूल, शिवणी आदी विभागातील जनता पथकापथकाने समारंभाच्या जागेकडे ' बुद्धं सरणं गच्छामि ' च्या घोषणा करीत येतील.

या प्रसंगी वर्धा आणि इतर भागातील सवर्ण हिंदुंचा एक प्रचंड गट बौद्ध दीक्षेसाठी येणार आहे. दीक्षा प्रसंगी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले पाहिजे व दीक्षा घेणाराचे वय अठरा वर्षपिक्षा अधिक असले पाहिजे हे नियम कसोशीने पाळले जातील.

त्याच दिवशी सायंकाळी नागपूर येथेच डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्म स्वीकारावरील ऐतिहासिक भाषण होणार आहे. जगाच्या धार्मिक इतिहासातील या क्रांतिकारक घटनेचे प्रत्यक्ष अवलोकन करण्याची संधी व त्यात भाग घेण्याचे महद्भाग्य आपल्याला लाभलेले आहे. असे सांगतात की, भगवान बुद्धानंतर प्रथमतःच एका वेळी, एका दिवशी, एके ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने बौद्ध

धर्म स्वीकार केल्याचे कोठेही नमूद नाही.

नागपूरचे वैशिष्ट्य

१९३० साली ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगची स्थापना, तद्नंतर १९४२

साली अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनची मुहूर्तमेढ डॉ. बाबासाहेबांनी

नागपूरला केली तसेच बौद्ध धर्म स्वीकाराचा समारंभ नागपूरलाच होणार.