१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 526

४८६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

याचप्रमाणे समितीच्या वतीने तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आयोजित सामुदायिक धर्मांतराकरिता जाहीर पत्रक काढण्यास आले होते. ते ' प्रबुद्ध भारत खास पुरवणी, तारीख १२ ऑक्टोबर १९५६ ' म्हणून प्रकाशित केल्या गेले. ते येणेप्रमाणे

'* ॥ नमो तस्स भगवतो-अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।।

सामुदायिक धर्मातर

भारतीय बौद्धजन समितीचे संस्थापक व अध्यक्ष परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्धधर्मदीक्षाग्रहणविधी ब्रह्मदेशीय पूज्य भिक्षू चंद्रमणी महास्थविर यांचे हस्ते नागपूर येथे रविवार, दिनांक १४ ऑक्टोबर, १९५६ विजयादशमीचे दिवशी होईल हे यापूर्वीच जाहीर पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.

भारताच्या इतिहासातच नव्हे तर अखिल बौद्ध जगताच्या इतिहासात या महान मंगल समारंभाची छाया आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, अबौद्ध-बौद्ध या सर्वांवरच आहे. अशा या भव्य समारंभात जनता लाखोंच्या संख्येने भाग घेईल यात शंका नाही. परमपूज्य बाबांच्या या महान समारंभाच्या व्यवस्थेचा भार भारतीय बौद्धजन समितीच्या नागपूर शाखेवर सोपविला गेला आहे. जनतेच्या-विशेषतः नागपूर निवासी जनतेच्या-सहाय्याने हा भार वाहिला जाणार आहे. तरी उभ्या आयुष्यात एवढा परमपवित्र प्रसंग दुसरा नाही हे जाणून नागपूरवासी जनता तनमनधनाने मदत करील अशी आशा आहे. नागपुरात प्रत्येक मोहल्ल्यात भारतीय बौद्धजन नागपूर शाखेची वर्गणी पुस्तके पाठविली आहेत. तरी आर्थिक मदत देताना पावती अवश्य घ्यावी. बाहेरगावच्या मंडळींनी मनिआऑर्डरने समितीच्या चिटणीसांना वर्गणी पाठवावी. या महान समारंभाच्या स्वागत समितीच्या सभासदत्वाची फी २५ रु. आहे. दिनांक १० आँक्टोबर १९५६ ला किंवा तत्पूर्वी ही फी भरून कोणालाही स्वागत समितीचा सदस्य होता येते.

धर्माचे हे परम पवित्र कार्य अखंड आहे. त्यासाठी परमपूज्य बाबांनी भारतीय बौद्धजन समिती स्थापन केली आहे. वार्षिक वर्गणी १ रुपया देऊन सभासद बनणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समितीच्या सीताबर्डी येथील कार्यालयात सभासदांची नोंदणी मुंबई केंद्रीय समितीचे चिटणीस श्री. भ. स. गायकवाड हे करीत आहेत. तरी प्रत्येकाने १ रुपया देऊन नाव नोंदवून घ्यावे. ज्यांनी मागचे वर्षी वर्गणी दिली त्यांनी देखील या वर्षीची वर्गणी द्यावी व पावती घ्यावी.

या समारंभाला कसलेही तिकीट नाही. जे दीक्षा घेणारे आहेत त्यांना किंवा प्रेक्षकांना कोणालाच तिकीट किंवा फी नाही. या समारंभाला सर्वानी उपस्थित राहावे ही विनंती.