१६-२-१९४६ मार्याच्या जागा काबीज करा (????) - Page 54

१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काँग्रेस अस्पृश्यांकरिता काही करणार नाही. दोन वर्षे सात महिने कॉंग्रेसच्या हाती सत्ता असता तिने आपल्याकरता काहीच भरीव कार्य केले नाही. आज वीस वर्षे काँग्रेसचे व आमचे भांडण चालू आहे. आमची स्वातंत्र्याची व स्वावलंबनाची चळवळ हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने भलेबुरे सर्व प्रयत्न केले आहेत आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी, आमच्या राखीव जागेवरसुद्धा तिने आपल्या पदरचे ' हरिजन ' उभे केले आहेत.

यावेळी माझा तुम्हाला स्पष्ट इशारा आहे की, तुम्ही ही निवडणूक जिंकून राजकीय सत्तेच्या योग्य त्या माऱ्याच्या जागा काबीज करा, यातच सबंध अस्पृश्य वर्गाचे कल्याण आहे. महार समाज हा अस्पृश्य वर्गाचा म्होरक्या आहे हे सांगण्यास मला अभिमान वाटतो. आमची संघटना काँग्रेसच्या डोळ्यात सारखी सलत आहे.

मला सांगण्यास खेद वाटतो की, महार समाजातील बॅ. माने हे आपल्या हितशत्रुंना सामील झाले आहेत. आपल्या राखीव जागेसाठी सध्या तीन उमेदवार उभे आहेत. दलित फेडरेशनचे वराळे, फेडरेशनद्रोही माने आणि साम्राणी. पण साम्राणींनी आपली उमेदवारी परत घेतली असे समजते. अर्थातच आता वराळेविरुद्ध माने असाच सामना राहिला,

माझ्या असे ऐकण्यात आले आहे की, माने हे स्वत:ला स्वतंत्र उमेदवार समजतात आणि तसा प्रचारही करतात. पण त्यात काहीच अर्थ नाही. ते काँग्रेसचे बाहुले बनले आहेत. काँग्रेसचे तिकीट त्यांना मिळाले नाही म्हणून ते स्वतंत्र आहेत असे कोणी मानू नये. जरी काँग्रेसचे कुंकू त्यांना लागले नसले तरी काँग्रेसशी त्यांचा म्होतुर लागला आहे असे म्हणण्यास कोणती हरकत आहे? ज्याअर्थी, लड़े मानेला निवडून आणण्याकरिता सर्व तर्‍हेचे प्रयत्न करतात आणि काँग्रेसही आपला अधिकृत दुसरा उमेदवार जाहीर करीत नाही त्याअर्थी, माने हेच त्यांचे उमेदवार आहेत ही गोष्ट आपोआपच सिद्ध होते.

दिवाणबहादूर....नव्हे, नव्हे ! मि. लह्ठे हे बॅ. मानेला निवडून आणण्यासाठी मोठ-मोठ्या भडक प्रचाराच्या वल्गना करीत सुटले आहेत. मि. लङ्घेंना या जिल्ह्यात कितीसा पाठिबा आहे, कोण जाणे? त्यांना स्वतःला उमेदवारीचे तिकीट मिळविण्याच्या बाबतीत काँग्रेस-हायकमांडपर्यंत नाकधुऱ्या काढाव्या लागल्या, असे असता मि. ल्हठेंच्या प्रचाराचा काय उपयोग होणार आहे? त्यांची ही दमबाजी आता सर्वाना कळून चुकली आहे.