१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 535

बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ४९५

जनताजनार्दनाचे हे “ परब्रह्मी ” बिशाल स्वरूप मी जन्मात कधी विसरणार नाही. आपल्या असामान्य नेत्याच्या हाकेला ओ देऊन हे लोक नागपूरला जमा होत होते. आपल्या नेत्याची आज्ञा वंदनीय मानून त्याच्या पाठोपाठ बुद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निश्चय त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. ते गंभीर होते पण आनंदी होते. भारताच्या चारी कोनातून लाखो अस्पृश्यांनी नागपुरात गर्दी केली आहे. रेल्वे, मोटारी, रिक्षा, बैलगाड्या आदी वाहनांचा उपयोग दूर दूरहून येणारे करीत होते. वाहनांच्या धंदेवाल्यांचे उखळ पांढरे होत होते, पण यापेक्षाही जेव्हा मला हजारो अस्पृश्य बांधव पुण्यापासून पंढरीच्या यात्रेला पायी जावे त्याप्रमाणे नागपूरला येत आहेत असे दिसले, तेव्हा तर माझ्या आश्‍चर्याला सीमा राहिली नाही. ७५ /१०० मैलांवरूनही हे लोक नागपूरला येत होते, वाटखर्चाच्या पैशाची सोय स्वतःजवळचे किडुक मिडुक विकून त्यांनी केली होती. कित्येक लोकांना गावच्या लोकांनी वर्गणी जमा करून पाठविले होते. त्यांच्या उत्साहाला सीमा नव्हती. त्यांच्या ” जय भीम ” च्या आणि इतर घोषणांना खंड नव्हता. एका काळी बौद्ध महापंडित नागार्जुन यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे नागपूर शहर आज तमाम अस्पृश्य समाजाचे धर्मक्षेत्र झालेले दिसले.

नागपूर शहरामध्ये वाहनांची अतिशय गैरसोय आहे. मुंबईसारख्या मीटर असलेल्या टॅक्सी नाहीत आणि पुण्यासारख्या ऑटोरिक्षा नाहीत. टॅक्सी तासावर ठरवावयाची आणि किमान साडेतीन रुपये तास भाडे द्यावयाचे. टॅक्सी ड्रायव्हर ताबडतोब वर्दळीवर येणारे; बरे सायकल रिक्षा करावी तरं ते पुण्या-मुंबईकडील माणसाला कसेसेच वाटते आणि गावातील वातावरण बुद्धमय. बुद्धाच्या जयजयकाराच्या घोषणा आजुबाजूला होत असताना, एक माणूस दुसऱ्या माणसाला धापा टाकीत ओढून नेतो आहे हे दृश्यच एकंदर वातावरणाशी विसंगत वाटते. मी शेवटी एक टॅक्सी ठरविली आणि सर्व दीक्षार्थी निवासांना भेट देण्याचे ठरविले. या सर्वांची सोय प्राथमिक शाळांमधून केली होती. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक होते आणि ते पाणी देणे वगैरे कामे त्वरेने करीत होते. बरेचसे लोक हॉटेलात जावून काही तरी खात होते, पण अनेक ठिकाणी तीन दगडाच्या चुली मांडून त्यावर कित्येक बाया भाकऱ्या भाजीत असलेल्या दिसल्या. ठिकठिकाणी लोक दहा-दहा, पाच-पाच असे बसून चर्चा करीत होते. लेनिनने कोठे तरी म्हटले आहे की, जी गोष्ट शिकण्यास एरवी वर्षानुवर्षे लागतात, तीच गोष्ट क्रांतीच्या काळात जनता काही दिवसातच शिकते. या दोन दिवसात नागपूरला जमलेल्या लाखो लोकांनी तत्त्वज्ञानाचे, धर्माचे, सामाजिक परिस्थितीचे जितके ज्ञान मिळविले तितके त्यांना आतापर्यंत कधीच मिळालेले नाही, असे म्हटल्यास बिलकूल अतिशयोक्ती होणार नाही.

वि (वाय) ४११--३३-अ