४९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पहाटे ३ च्या सुमारासच घोषणा ऐकून मी जागा झालो आणि खिडकीपाशी जाऊन पाहू लागलो. रस्त्यावरून मुंग्यांसारखी माणसे चालली होती. वातावरण शांत होते, घोषणा गंभीर होत्या. लोक भराभर मंडपात जागा अगोदर पटकावण्यासाठी जात होते. सकाळी सहा वाजता मीही या जनसमुदायात सामील झालो आणि मंडपाकडे निघालो. बहुतेक स्त्री-पुरूषांनी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केलेली होती. तशा तर्हेची सूचना सर्वांनाच देण्यात आली होती.
मी मंडपात प्रवेश केला. मुंबई समता सैनिक दलाने व्यवस्था उत्कृष्ट ठेवली होती. कोठेही गडबड नव्हती, गोंधळ नव्हता. श्रद्धायुक्त अंतःकरणाने लोक शांतपणे मंडपात प्रवेश करून स्वयंसेवकाने दाखविलेल्या जागी बसत होते. सकाळी सात वाजताच निम्मा मंडप भरलेला दिसला. दोन अडीच लाख लोक तरी असावेत. वार्ताहरांपैकी अद्याप कोणीही आलेले नव्हते. वार्ताहरांसाठी स्टेज जवळच व्यवस्था केली होती. लाऊडस्पीकरची व्यवस्था उत्कृष्ट होती. लाऊडस्पीकरवरून नेहमीप्रमाणे मुलगी हरवली, मुलगा हरवला, अशा सूचना होत होत्या. समाज सारखा वाढत होता.
याच वेळी लाऊडस्पीकरवरून एक महत्त्वाची घोषणा झाली. " दीक्षार्थींना प्रवेशपत्रिका देण्यात आल्या, पण दीक्षार्थीची संख्या इतकी वाढली की प्रवेशपत्रिका संपल्या. तेव्हा कोणीही मला दीक्षा घ्यावयाची असे सांगितले की, त्याला आत सोडा आणि दीक्षार्थी मंडपात नेऊन बसवा '' अशी लाऊडस्पीकरवरून घोषणा करावी लागली. समाज वाढतच होता, जनतेच्या अफाट उत्साहामुळे पूर्वनियोजित कित्येक व्यवस्था कोलमडून पडत होत्या. पण त्या उत्साहामुळेच सर्व काही व्यवस्थितपणे पार पडत होते.
मानवी प्रेमभावना
मी. स्तूपाच्या आकाराच्या विशाल व्यासपीठाकडे नजर टाकली. भगवान बुद्धाची धीरगंभीर प्रतिमा सर्व मानव जातीला आपला आशिर्वाद देत होती. डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा लाखो लोकांना उत्साह आणि आश्वासन देत होती. बुद्ध धर्माचा झेंडा शांतपणे वाऱ्यावर फडफडत होता. व्यासपीठावरही भगवान बुद्धाची एक प्रतिमा होती. तिच्यापुढे उदबत्या जळत होत्या. त्यांचा मंद चंदनी सुवास वातावरणात एक प्रकारे गंभीरता निर्माण करीत होता. माणूस माणसाच्या जास्त जास्त जवळ येत होता. सर्वाच्या अंतःकरणात एकच मानवी प्रेमाची भावना उफाळत होती. मित्र एकमेकांना भेटत होते. एकमेकांचे सुहास्य मुद्रेने स्वागत करीत होते. राग, द्वेष, असूया मंडपातून हद्दपार झाले होते. लाऊडस्पीकरवरून घोषणा होत होती, ' भगवान गौतम बुद्ध की जय. `