मार्याच्या जागा काबीज करा! १७
कांग्रेसजनांच्या पैशांवर बॅ. माने निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. पण हा पैसा काँग्रेसचा नव्हे हे दाखविण्याकरिता तो महारवर्गानेच थेलीच्या रूपाने दिला असल्याचे भासविण्यात येते. दोन-दोन हजारांच्या थेल्या महारवर्ग देऊ शकेल काय ? येथे आजच्या सभेला २०-२५ हजार लोक उपस्थित आहेत. त्यांचा जर झाडा घेतला तर त्यांच्याजवळ शंभर कवड्याही निघणार नाहीत. मग हजाराची गोष्ट कशाला ? काँग्रेसचे हे भेदनीतीचे डावपेच आम्ही पुरतेपणी ओळखून आहोत. म्हणूनच आमचा स्पष्ट सवाल आहे की, हा पैसा तुम्ही अशा रीतीने का ओतता ? आमची संघटना फोडण्याचाच उद्देश आहे ना?
बॅ, माने आमच्यातून फुटू नयेत म्हणून मी पुष्कळ प्रयत्न केले, त्यांचे कल्याण व्हावे म्हणून मी झटलो. त्यांच्या शिक्षणाला करता येईल तेवढी मी मदत केली, त्यांच्या विद्येचा उपयोग व्हावा म्हणून मी काळजी वाहिली पण शेवटी माने यांनी आम्हाला दगा दिला. त्यांनी जज्ज व्हावे, सुप्रसिद्ध कायदेपंडित म्हणून कीर्ती मिळवावी अशी माझी फार इच्छा होती, पण ही माझी इच्छा फलद्रूप झाली नाही. त्यांनी शिकलेली विद्या उपयोगात आणली नाही. विलायतेला जाऊन इलेक्ट्रिसिटीचा कोर्स घेऊन परत येणाऱ्या माणसाने संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग न करता त्याने जसा वहाणाचा कारखाना काढावा तसेच मानेंचे झाले आहे. कोल्हापूरसारख्या संस्थानात त्यांना आपली चमक दाखविता आली नाही. ज्या ठिकाणी अधिकारी वर्ग अस्पृश्यांच्या उन्नतीला पोषक आहे त्याठिकाणी त्यांना स्वतःची प्रगती साधता आली नाही त्या मानेंना आता ब्रिटिश हिंदुस्थानात काय करता येणार आहे? मान्यांनी स्वज्ञातीचा द्रोह केला आहे.
माझ्या असे प्रत्ययास आले आहे की, तंबाखुचा व्यापार करणाऱया महार लोकांना ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या आपणच मिळवून दिल्या असा माने यांनी प्रचार चालविला आहे. पण तो साफ खोटा आहे. ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या मी मिळविल्या आहेत, मान्यांनी नव्हे! माने दिल्लीला माझ्याकडे आले आणि ते माझ्या घरीच उतरले. आपल्याला " कोल्हापूरच्या रिजन्सी कौन्सिलात 'मिनिस्टर' करा" ही मागणी करण्याकरिताच ते माझ्याकडे आले. पण ते जमले नाही अशी वस्तुस्थिती आहे.
शेवटी तुम्हाला एवढेच सांगणे आहे की, श्री. वराळे यांनाच प्रचंड मताने निवडून द्या.