१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 540

५०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

होता. भारतामध्ये बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन करण्यासाठी प्रत्यक्ष बौद्ध धर्म स्वीकाराचा जो इतिहास लिहिला जाईल, त्यामध्ये इतिहासकारांना या निवेदनास खास महत्त्व द्यावे लागेल एवढेच नव्हे तर भारतीय भूमीत बौद्ध धर्माच्या पुनःश्च बीजारोपणाचे त्यामुळे भारतभर व्हावयाच्या प्रचंड प्रसाराचे मूलांकूर या निवेदनामध्ये सापडतील.

हे निवेदन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. दैनिक बातम्या देणाऱ्या भारतीय वृत्तपत्रांनी, हे त्रोटक निवेदन, त्यांच्या सोईप्रमाणे, एका कॉलममध्ये तसेच दिले. जणू अनेक बातम्यांपैकी, ही नित्यापैकी एक बातमी असावी त्याप्रमाणे वृत्तपत्रांनी त्या निवेदनाची सामान्य दखल घेतल्याप्रमाणे वर्तन केले व त्या बातमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्म स्वीकारणार ही माहिती अखिल भारतीयांना कळली.

धर्म पुरुषांची प्रथम वाणी

` तथापि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या त्रोटक निवेदनामध्ये किती विलक्षण सामर्थ्य आहे व ते भारतीय समाजरचनेचा विचार करता, किती असामान्य प्रतीचे आहे, याची कल्पना भारतीय वृत्तपत्रांना जवळजवळ आलीच नाही, असे म्हणावे लागते. या निवेदनातील वृत्त नेहमीच्या तृत्तांप्रमाणे नव्हते. रोजची वृत्तपत्रात येणारी बातमी व सदर निवेदन यामध्ये सर्वदृष्टींनी महान फरक होता. ज्या ज्या धर्मसंस्थापकांनी, अगर त्या त्या धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या महापुरुषांनी, धर्म स्थापनेसाठी अथवा त्या धर्मावरील ग्लानी दूर करण्यासाठी आपली प्रथम वाणी उच्चारली त्याप्रमाणे त्या प्रथम वाणीची बातमी पोहोचविणारे हे निवेदन होते.

बौद्ध दीक्षेचा निश्चय करण्यापूर्वी

सदर निवेदनावर सही करण्यापूर्वी त्याचप्रमाणे बौद्ध दीक्षेचा विधी, ठिकाणं व तारीख ठरविण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती तासनतास विचार केला असेल याची कल्पना कोणासही येणार नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी, त्यांच्या नजरेपुढे या घटनेचे संभाव्य असे कोणकोणते परिणाम भारतातील दलित जनतेवर, भारतीयांवर व जगातील इतर जनांवर होतील, यांचे चित्र खचित उभे झाले असेल. निरनिराळया धर्माच्या इतिहासाची पाने त्यांच्या मन:चक्षू समोरून भराभर गेली असतील. खिश्चन धर्म, मुसलमानी धर्म, बौद्ध धर्म आदी प्रमुख धर्म जगात का व कसे उदय पावले, त्यांचा प्रसार कसा झाला व त्यापैकी काहींचा अस्त का झाला याचे त्यांनी पुनः पुनः मनन केले असेल. भारतीय दलितांना