५०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दीक्षाविधी म्हणजे मोजून गणित केल्याप्रमाणे भारतातील सुमारे पाच कोट अस्पृश्य बांधवाचाच दीक्षाविधी होय हे त्यांच्या (डॉ. बाबासाहेबांच्या) मागे असलेल्या अनुयायांच्या संख्येवरून व अनुयायांच्या निष्ठेवरून मानावयास मुळीच हरकत नाही हे त्यांनी ओळखले. भारतामध्ये प्रथम दृढमूल झालेली पण आज बिलकूल सुकून गेलेली बौद्ध धर्माची पाळेमुळे पुनःश्च टवटवीत कशाने होणार असतील तर भारतातील दरेक खेड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जे असंख्य अनुयायी आहेत, त्यांच्या दीक्षाविधीने व निष्ठेनेच होतील, हे आता बौद्ध जनास चांगलेच कळून चुकले आहे. तेव्हा या दृष्टीने बौद्ध जगताला, डॉ. बाबासाहेबांच्या बौद्ध दीक्षेबद्दल आकर्षण वाटणे स्वाभाविक होते.
मूर्तिमंत प्रज्ञा मिळाली
- परंतु, याहीपेक्षा दुसऱ्या दृष्टीचे आकर्षण त्यांना अधिक होते, असे म्हणावयास हरकत नाही. बौद्ध धर्मामध्ये प्रज्ञेचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. शांतता, न्याय व प्रज्ञा असा क्रम बौद्ध धर्माच्या शिकवणुकीचा आहे. बुद्ध म्हणजे प्रज्ञावंत, आणि प्रज्ञा म्हणजे ज्ञान संपन्न व जीवन विन्मुक्त ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेकडे सहज दृष्टी टाकली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मूर्तिमंत प्रज्ञाच आहे असे म्हणण्यात अतिशयोक्तिची चूक होईल असे वाटत नाही. अशी प्रज्ञामय घ्यक्ती लाभणे अत्यंत दुर्मिळ असते. लक्षावधी, नव्हे, करोडो रुपये देखील खर्ची घालून अशा व्यक्तीचे साधे मत अगर पाठिंबा मिळविणे कठीण असते. ज्ञान ही अपूर्व मोलाची चीज आहे, अणुशास्त्राचे ज्ञान गुपितपणाने फोडण्याचे प्रकार आता सर्वांना माहीत झाले आहेत. त्यासाठी, केवढे पहारे ठेवले जातात, परराष्ट्रीय वकालतीत मसलती होतात आणि गुप्तपणे असे ज्ञानी लोक ' पळवून ' नेण्यासाठी केवढा अमाप पैसा खर्च केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्ञान अतुलनीय आहे. त्यांचे धर्म विषयक ज्ञान म्हणजे, मनाच्या सूक्ष्म रचनेचे व मनुष्यत्व पूर्णत्वास नेण्यासाठी मन. सुसंस्कृत बनविण्याचे ज्ञान आहे. जगातील कोणत्याही धर्माच्या प्रसारकापेक्षा सरस ठरू शकेल असे त्यांचे ज्ञान आहे. तेव्हा डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी, बौद्ध जगताला पाठिंबा दिलेला आहे एवढेच नव्हे तर आपले ज्ञान
बौद्ध धर्मासाठी अर्पण करून बौद्ध धर्माचे ते जवळजवळ एकमेव पुरस्कर्ते बनले
आहेत. नव्हे, चालू युगातील ते भारतीय बुद्धच होत. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या बौद्ध दीक्षेमुळे बौद्ध जगतास, अपूर्व ज्ञानाचा पुरस्कर्ता अत्यंत
निकडीच्या वेळी प्राप्त झाला या दुसऱ्याही दृष्टीने अखिल बौद्धजनांना
डॉ. बाबासाहेबांच्या वरील निवेदनामुळे परमहर्ष होणे स्वाभाविक आहे.