१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 543

बुद्ध धर्मनिच जगाचा उद्धार होणार आहे ५०३

भारतातील दलित जनतेची प्रतिक्रिया अपरिमित आनंदाची होती. विशेषत: नागपूर ते मुंबई या दोन शहरात व त्या दरम्यानच्या प्रदेशात उत्साहाची प्रचंड लाटच उसळल्याप्रमाणे झाले. ' प्रबुद्ध भारत ' हे दलित जगताचे जणू काही अधिकूत असे गॅझेटच आहे. त्यामध्ये ता. २९ सप्टेंबर १९५६ व १३ ऑक्टोबर १९५६ च्या अंकात लागोपाठ बौद्ध-दीक्षा-विधीची बातमी दलित जनतेच्या झोपड्या- झोपड्यातून पोहोचविण्यात आली. नागपूर भागातील ' सिद्धार्थ ' ' धर्मदीप ' ' धर्मदूत ' ' बोधीसत्व ' याही प्रसंगानुरूप प्रसिद्ध होत असलेल्या साप्ताहिकांनी मध्यप्रदेशातील विभागात सदर माहिती प्रसृत केली. नागपूर शाखेच्या भारतीय बौद्धजन महासभेच्या समितीने छापील पत्रके काढून, सर्व दलित बांधवांस, बौद्ध-दीक्षा-विधीच्या कार्यक्रमाबद्दल तपशीलवार माहिती दिली.

कार्यक्रमाचा तपशील

समितीच्या पहिल्या छापील पत्रिकेत स्वागत समितीचे अध्यक्ष, श्री. रेवाराम कवाडे व श्री. वा. मो. गोडबोले यांनी खालील कार्यक्रम जाहीर केला.

सामुदायिक धर्मांतर कार्यक्रम पत्रिका

शनिवार ता. १३-१०-५६ रोजी सायंकाळी ५ ते ८ परित्राण. ८ ते १० महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी, श्री. डी. वलीसिन्हा यांचे भाषण; आणि भगवान्‌ बुद्धाचे चरित्र व भारतातील प्रसिद्ध बौद्ध स्थळे यावर मॅजिक लॅन्टर्न शो.

रविवार ता. १४-१०-५६ (अशोका विजयादशमी) सकाळी ८ ते ११ परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब आंबेडकर आणि इतर दीक्षार्थीची पूज्य भिक्षू चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध-धर्म-दीक्षा, सकाळी ११ ते ११ , २५ महाबोधी सोसायटी, कलकत्ता तफ परमपूज्य डॉ. बाबासाहेब यांना भगवान बुद्धांची प्रतिमा भेट. सायंकाळी ६ ते ७ महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी श्री. डी, वलीसिन्हा यांचे भाषण. सायंकाळी ८ ते ११ बोधिमंडळ, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद यांचा ''युगयात्रा* या मराठी नाटकाचा प्रयोग.

` सोमवार ता. १५-१०-५६ सकाळी ८ ते ११ परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जाहीर "भाषण. सायंकाळी ८ ते १० मॅजिक लॅन्टर्न शो.

याशिवाय स्वागत समितीने इंग्रजी भाषेत एक पत्रिका प्रसिद्ध केलेली होती. त्यानंतर स्वागत समितीने प्रसिद्ध केलेली तिसरी पत्रिका ता. १३-१०-५६ च्या ' प्रबुद्ध भारत' च्या अंकात खास पुरवणी म्हणून प्रसिद्ध केलेलीच आहे. एवढ्या साधनानिशी बौद्ध-दीक्षा-विधी समारंभाची समयोचित माहिती भारतातील दलित वर्गांना व इतरांना देण्यात आली.