१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 544

५०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ही माहिती प्रसिद्ध झाल्या झाल्या ज्यांना ज्यांना या बौद्ध-दीक्षा-विधीसमारंभास जावयाचे होते, त्यांनी आपापल्या परी तयारी केली. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या दलित बांधवांनी तर आपले रेल्वे सवलतीचे पास मुक्रर करून टाकले, भारतीय बौद्ध महासभेचे चिटणीस श्री. सवादकर, श्री. कबीर व श्री. गायकवाड यांनी पत्रके काढून, ज्यांना नागपूरास यावयाचे आहे त्यांच्या जाण्या-येण्याची रेल्वेची सवलतीची तिकीटे त्यांनी नावे नोंदविल्यास मिळवून देण्याची व्यवस्था केली जाईल असे जाहीर केले. मुंबई प्रदेश दलित फेडरेशननेही अशीच व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. या संयुक्त प्रयत्नांमुळे, मुंबईहून एक खास रेल्वेची गाडी ता. १३ ऑक्टोबर १९५६* रोजी बौद्ध दीक्षा विधीच्या आदले दिवशी रात्री सोडण्यात आली. खास गाडी, फुल भरून गेली होती. ता. १३ ऑक्टोबर १९५६ या दिवशीच्या रात्रीच्या नागपूर-एक्सप्रेसने कर्नाटकातून आलेले कर्नाटक प्रदेश शे. का. फे. चे अध्यक्ष श्री. डी. ए. कट्टी व मुंबईहून सिद्धार्थ कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. तळवटकर हे निघाले. त्यांना योगायोगाने त्याच गाडीत, ` नासिकचे श्री. ए. जी. पवार, वकील, भेटले. ' नवयुग ' ने मुद्दाम पाठविलेले खास प्रतिनिधी याच गाडीने आले. खास सुटलेल्या रेल्वे गाडीने मुंबई प्रदेश दलित फेडरेशनचे ज. सेक्रेटरी श्री. दहिविलकर बुवा, श्री. आर. जी. खरात, याशिवाय मुंबईहून वॉर्ड कमिट्यांचे असंख्य कार्यकर्ते होते. सर्वाचा निर्देश या ठिकाणी करणे अक्षरशः अशक्यप्राय आहे. एवढी ती प्रचंड गर्दी होती.

प्रवासात, गाडीमधून ही दीक्षार्थी मंडळी, “ बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार “ ” भगवान बुद्ध की जय “ ”' डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय "' या व अशा घोषणा वारंवार देत होती. . ठिकठिकाणची रेल्वे स्टेशने या सामुदायिक घोषणांनी दुमदुमून गेली होती. मुंबई ते नागपूर जणू अहोरात्र, जागृत जनताच चाललेली आहे असे ते अपूर्व दृश्य होते. या मंडळीत भगिनीमातांची संख्याही जवळ जवळ एक तृतियांश होती. नागपूर रेल्वे स्टेशनवर ता. १३ व १४ ऑक्टोबर १९५६ रोजी येणाऱ्या रेल्वेच्या गाड्या सर्व बौद्ध दीक्षा घेऊ इच्छिणारांनीच गच्च भरून येत होत्या.

नागपूर शहराच्या दक्षिणेस जवळ जवळ शहराच्या बाहेर अंबाझरी नावाचा रोड आहे. या रोडला लागून असलेले सुमारे १४ एकर क्षेत्राचे विस्तीर्ण मैदान बौद्ध-दीक्षा-विधीसाठी मुक्रर करण्यात आले होते. या मैदानास सभोवार तट्टे मारले होते. सर्व मैदानाच्या सभोवार सुमारे २,००० ते ३,००० विद्युत दीपांची

*ही तारीख १२ ऑक्टोबर १९५६ असायला हवी--संपादक.