१७-२-१९४६ मरणाच्या तयारीनोच आम्ही समरांगणात उतरलो आहोत - Page 56

२३७

मरणाच्या तयारीनेच आम्ही
समरांगणात उतरलो आहोत

मुंबईतील अस्पृश्य जनतेने केलेल्या संकल्पानुसार थैली अर्पण समारंभ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाषण आयोजित केले होते. त्याकरिता खालील पत्रक काढण्यात आले होते.

आपले परमपूज्य पुढारी नेक नामदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईतील अस्पृश्य समाजाकडून थेली अर्पण करणारा समारंभ रविवार ता. १७ फेब्रुवारी १९४६ रोजी सायंकाळी ५ वाजता जी.आय.पी. रेल्वे परळ वर्कशॉपसमोर साध्वी रमाबाई आंबेडकर नगर (नरेपार्क) येथे होणार आहे. या समारंभानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे भाषण होणार आहे. या समारंभास अस्पृश्य जनतेने हजर राहावे अशी विनंती आहे.

या समारंभास हजर राहणाऱ्या लोकांनी आठ आण्याची तिकिटे विकत घेतलीच पाहिजे. तिकिटांशिवाय सभेच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. तरी ज्यांनी आठ आण्याची तिकिटे आतापर्यंत घेतली नसतील त्यांनी ता. १५ फेब्रुवारीच्या आत आपापल्या वार्ड कमिटीकडून किंवा पोयबावडी येथील मुंबई शेड्यूल्ड कास्ट्सच्या फेडरेशनच्या ऑफिसातून ताबडतोब विकत घ्यावीत. सभेच्या ठिकाणी तिकिटे विकली जाणार नाहीत व तिकिटाशिवाय कोणासही प्रवेश मिळणार नाही.

तिकिटविक्रीपासून जमा होणारी सर्व रक्कम आपले परमपूज्य पुढारी नेक नामदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण करण्यात येईल. थैलीची रक्कम कमीतकमी पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असता कामा नये अशी मुंबईच्या जनतेची इच्छा असल्यामुळे थैलीची रक्कम पूर्ण करण्याकरिता एक रुपया, दोन रुपये किंवा पाच रुपये किंवा याहीपेक्षा जास्त पैसे घेण्याची योजना आखण्यात आली आहे. तरी अशा देणग्या दिल्यास त्यांचा साभार स्वीकार केला जाईल. देणग्या देणाऱ्या स्त्रीपुरुषांच्या नावाची यादी छापून प्रसिद्ध केली जाइल. तरी याचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या लोकांनी ताबडतोब देणगीची रक्कम वार्ड कमिटीकडे किंवा मुंबई शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या ऑफिसात १५ फेब्रुवारीच्या आत देण्याची कृपा करावी.

जनता : ९ फेब्रुवारी आणि २ मार्च १९४६.