१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 557

बुद्ध धमनिच जगाचा उद्धार होणार आहे ५१७

खाली असली की त्या जागा भरतात, त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे, कोणा इतराचे किती अर्ज येतात | मग नोकऱ्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही ?

आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता, असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते ; आमच्या मुंबईत, व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी ८ ला उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात (डॉक्टरसाहेबांनी यावेळी आवाजात फरक करून नक्कल करून सांगितले) ' सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये. “ तो सुलेमान ते घेऊन येतो, शिवाय चहा, पाव केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्मीय भगिनींना साधी चटणीभाकरी देखील मिळत नाही; मात्र त्या इज्जतीने राहातात. त्या सदाचारानेच राहातात.

आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता ! मनुष्यमात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक (त्यांच्याकडे वळून) माझ्या मागे गेली ४० वर्षे हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली ! मी त्यांना म्हणतो, अजून तरी विचार करा, आतातरी पोरकटपणाची भाषा सोडून

काही प्रौढ भाषा वापरा

आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या) मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल, याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच ! हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे; आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन. .