५१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मलः एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे. पण एकाही माणसाने ' मी बौद्ध धर्मच का स्वीकारला ' हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला, हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. धर्मातर करताना धर्म कोणता व का घ्यावयाचा हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे. आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. "मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही '' अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखविली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायुच झाला आहे. नरकातून सुटलो असे मला : वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.
मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट (न्याहारी) मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळं संपल. हे त्यांचं तत्त्वज्ञान ! मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते; म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्याइतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुखसमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळीविरूद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती
व्हावयास पाहिजेच.
पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे की रेडा व बैल यांना मन नाही ; मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच