मरणाच्या तयारीनेच आम्ही समरांगणात उतरलो आहोत १९
हे पत्रक जी. एम. जाधव, अध्यक्ष व एस. बी. जाधव, जनरल सेक्रेटरी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन, मुंबई (शहर व उपनगर) शाखा यांनी काढले होते.
मुंबईतील ता. ३ जानेवारी १९४६ रोजी झालेल्या प्राथमिक निवडणुकीच्या दिवशी हुतात्मा चोखाजी सावळाराम गांगुर्डे यांचा काँग्रेस गुंडानी केलेला अमानुष खून आणि या हुतात्म्याच्या प्रेतयात्रेवर ता. ४ जानेवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेला क्रूर लाठीहल्ला. त्यात बळी पडलेला वीर रामचंद्र गुंडू कांबळे आणि तद्नंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी अस्पृश्यांच्या वस्तीवर करण्यात आलेले आक्रमक हल्ले वगैरे घटनांच्या बाबतीत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात ?' हे ऐकण्यासाठी मुंबईतील अस्पृश्य जनता आतुर झालेली होती. डॉ. बाबासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण भाषणासाठी मुंबई (शहर व उपनगर) शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन शाखेच्या कार्यकर्त्यांनी दोनदा सभेची तारीखही जनतेतून जाहीर केली होती. परंतु दोन्ही वेळा कामाच्या अमर्याद व्यापामुळे डॉ. बाबासाहेबांना येता येणे शक्य नव्हते म्हणूनच दोनदा सभा तहकूब झाली. तिसऱ्यांदा ता. १७ फेब्रुवारी १९४६ रोजी मात्र या गाजलेल्या सभेने मुंबई गाजविली.
अखिल भारतीय शेड्यूल कास्ट्स फेडरेशनचे तिसरे अधिवेशन ज्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडले त्याच ठिकाणी साध्वी रमाबाई आंबेडकर नगरात (नरेपार्क) ही विराट सभा घेण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब, सन्माननीय निमंत्रित पाहुणे मंडळी, उमेदवार, फेडरेशनच्या निरनिराळ्या वार्डाचे कमिटी सभासद आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्यासाठी खास मंडप उभारण्यात आला
होता.
या सभेला आगाऊ जाहीर केल्याप्रमाणे आठ आण्याचे प्रवेश तिकिट असल्यामुळे एक निमंत्रित पाहुण्यांसाठी, एक स्त्रियांसाठी व तीन पुरुषांसाठी मिळून पाच प्रवेशद्वारे ठेवण्यात आली होती. सभेची सर्व व्यवस्था समता सैनिक दलाकडे होती. प्रत्येक प्रवेशद्वाराजवळचे सैनिक आपापले कर्तव्य चोखपणे बजावीत होते. दुपारी तीन वाजल्यापासून लोक येऊ लागले होते. मुंबई बाहेरील बऱयाच ठिकाणचे लोक बाबासाहेबांच्या या भाषणासाठी मुद्दाम आले होते. पाच वाजेपर्यंत सुमारे तीस हजार लोक नगरात दाखल झाले होते. ज्यांच्याजवळ तिकिटे नव्हती असे बरेचसे लोक बाहेर वावरत असताना दिसत होते. व्यासपीठावर मुंबई प्रांतिक विधिमंडळाच्या आगामी निवडणुकीसाठी उभे राहिलेले फेडरेशनचे अधिकृत उमेदवार गुरुवर्य दोंदे व बाबासाहेबांची अस्पृश्यवर्गीय स्नेही मंडळी. ` त्याचप्रमाणे डाव्या बाजूस वार्ड कमिट्यांचे सभासद, उजव्या बाजूस भगिनीवर्ग, व्यासपीठाला लागूनच समोर वर्तमानपत्रांचे वार्ताहर आणि समोर अफाट जनसमुदाय, असे एकंदरित दृश्य दिसत होते.