५२० डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे
मुसलमानांकरता अलिगड युनिव्हर्सिटीस तीन लाख रुपये शिक्षणाकरता खर्च करता. त्याचप्रमाणे बनारसच्या हिंदू विद्यापीठासही तुम्ही तीन लाख रुपये देता. मात्र आम्ही हिंदू नाही की मुसलमान नाही. आमच्यासाठी काही करावयाचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावयास हवे. निदान आमच्यासाठी मुसलमानाइतके तरी करा. तेव्हा लिन्लिथगोने सांगितले, तुम्हाला याबाबत काय लिहून आणावयाचे ते आणा ! त्याप्रमाणे मी एक मेमोरँंडम लिहिले. ते चोपडे अजून मजजवळ आहे. युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते. त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. पण घोडे जे पेंड खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करावयाचे त्यावर ! त्यांना वाटत होते, आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत, त्यांना शिक्षण द्यावे, त्यांची बोडिंग काढावीत व त्यावर, ते पैसे खर्च करावेत. आमच्यातील मुलींना शिकविले व सुशिक्षित केले तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वान्नांचे पदार्थ करावयास घरी सामान कोठे आहे ? त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय ? इतर गोष्टीवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील अंडवून ठेवली.
म्हणून एके दिवशी मी लिन्लिथगोकडे गेलो आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो. मी एकटा ५० ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही ? ते त्यांना मान्य करावे लागले. नंतर मी पुन्हा विचारले, याचे कारण काय ? ते म्हणाले, ' ते कारण आम्हास माहीत नाही.' मी म्हणालो की माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो. मला अशी माणसे हवी आहेत. कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार? . त्यासरशी लिनुलिथगोस माझे म्हणणे पटले, व त्या वर्षी १६ विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. त्या १६ जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली. ही गोष्ट निराळी ! पुढे राजगोपालाचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली.
या देशात आम्हाला हजारो वर्ष निरुत्साही करून ठेवील, अशी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही. याबाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातुक आहे. मनुस्मृतीत लिहिले आहे की शूद्रांनी फक्त सेवा चाकरी