५२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
असे ओळखणे अशक्य असते. त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे, आणि तो महापुरूष म्हणजे भगवान बुद्ध होय. (प्रचंड टाळ्या)
काही लोक असे म्हणतात, तुम्ही धर्मातर करण्यास इतका अवधी का लावला ? इतके दिवस काय करीत होता ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल. माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे, तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करीन. (डॉ. बाबासाहेब चिरायू होवोतच्या घोषणा व निनाद.)
महार बौद्ध झाले तर काय होईल, असे काही लोक म्हणतील. असे त्यांनी म्हणू नये, असे माझे त्यांना सांगणे आहे. ते त्यांना धोकादायक होईल. वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही. त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहाण्यास बंगला आहे, त्यांची सेवा करावयास चाकर नोकर आहेत, त्यांना धन संपत्ती आहे, मानमरातब आहे, अशा माणसांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्याचे कारण नाही.
धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. +०००! जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल ? धर्म आशादायी बनवितो, व पीडितांना, . गरिबांना संदेश देतो ; ” काही घाबरू नकोस, होईल, जीवन आशादायी होईल " म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहातो.
जेव्हा युरोपमध्ये खिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे. त्यावेळी खिस्ताचे अनुयायी कोण झाले ? गरीब पिडलेले लोकच झाले. युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता खिस्ती बनली. हा खिश्चन धर्म भीक मागणाऱ्यांचा आहे, असे गिबनने म्हटले होते. खिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वाचा धर्म कसा झाला, याचे उत्तर द्यावयास गिबन आज हयात नाही ; नाहीतर याचेही उत्तर त्याला द्यावे लागले असते.
काही लोक असे म्हणतील, हा बौद्ध धर्म महारड्या-मांगांचा धर्म आहे. ब्राह्मण लोक भगवंताला 'भो गौतम ' म्हणजे ' अरे गौतम ' असे म्हणत