बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ५२५
की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे. (प्रचंड हंशा) लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलाविले व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने गग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो. मला शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक्ट जज्जाची नोकरी देऊ केली होती. . पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील, असे माझ्यापुढे कोडे होते, म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही:
मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. (टाळ्या) तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्वप्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हास नेण्याचे सर्व प्रयत्न करीन. आजतरी: तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे.
मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत् आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहाणार नाही.
हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिलेले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन, असा निश्चय करावा. मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागताने काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना ” या धर्माचा प्रचार करा “ असा आदेश