१७-२-१९४६ मरणाच्या तयारीनोच आम्ही समरांगणात उतरलो आहोत - Page 58

२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

डॉ. बाबासाहेबांच्या आगमनापूर्वी समाजोन्नतीपर स्फूर्तिदायक अशी सुश्राव्य गाणी झाली. त्यात कु. गोदावरी, मा. रोकडे व रामचंद्र यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बरोबर साडेपाच वाजता आले. "डॉ. बाबासाहेब आले" एवढेच कळताच टाळ्यांचा कडकडाट व निरनिराळे जयघोष यांचा सारखा ध्वनी ऐकू येऊ लागला. समता सैनिक दलाची पाहणी करण्याचे आगाऊ ठरल्यामुळे आल्याबरोबर बाबासाहेब समता सैनिक दलाच्या रॅलीकडे वळले. समता सैनिक दलातील सैनिकांना 'या पाहणीची' आगाऊच समज देण्यात आलेली असल्यामुळे प्रत्येक सैनिक अगदी तयारीत होता. सभेला जोडूनच एका विस्तीर्ण जागेत सर्व सैनिक शिस्तीत उभे होते. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या या मिलीटरीची शिस्त पाहून कोणीही तोंडात बोटेच घातली असती. डॉ. बाबासाहेबांच्या बरोबर मुंबई शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन शाखेचे अध्यक्ष श्री. जी, एम. जाधव व मुंबईतील समता सैनिक दलाचे जी. ओ. सी. श्री. एम. एम. ससाळेकर हे होते. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाबरोबर ब्युगूल वाजविण्यात आला व ब॑डवादन करून डॉ. बाबासाहेबांना 'गार्ड ऑफ ऑनर' (सलामी) दिला गेला. तद्नंतर डॉ. बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची पाहणी केली. ही पाहणी चालू असता डॉ. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज दिसत होते. मधून मधून ते सैनिकांबद्दल चौकशी करीत व काही माहिती विचारीत. त्यांच्या प्रश्‍नांना जी. ओ. सी. ससाळेकर उत्तर देत होते. अशा प्रकारे समता सैनिक दलाची पाहणी करून डॉ. बाबासाहेब व्यासपीठावर आले. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. डॉ. बाबासाहेब स्थानापन्न झाल्यावर जी. ओ. सी. ससाळेकर यांनी समता सैनिक दलाची प्रत्येक सैनिकाला घ्यावी लागणारी 'शपथ-प्रतिज्ञा' वाचून दाखवली.

मुंबई व उपनगर शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन शाखेचे अध्यक्ष श्री, जी. एम. जाधव ऊर्फ मडकेबुवा यांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केला आणि लोकांनी त्यांना टाळ्यांची प्रचंड साथ दिली. तद्नंतर नायगाव येथील 'महाराष्ट्र अम्युचुअर्स पार्टी' मधील लहान मुलांनी त्यांचे मुंबईतील लोकप्रिय 'चल चल रे दलित वीरा' हे गाणे कर्णमधुर सुरात गाऊन दाखवले.

या वेळेपावेतो बाहेर तुफान गर्दी झाली होती. डॉ. बाबासाहेबानी सर्वांना मंडपात दाखल करण्यासंबंधी आज्ञा फर्मावली, त्याचबरोबर लोकसमुदायाचा प्रयंड प्रवाह आत येऊ लागला. त्यावेळेस नगरात एकच गर्दी झाली. त्या जनसमुदायाचा अंदाज जवळजवळ पाऊण लाखांवर होता. पुन्हा शांतता प्रस्थापिण्यास जवळजवळ पाच मिनिटे लागली. नंतर मडकेबुवा यांनी, मुंबई